कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून प्राणघातक हल्ला

कुत्र्याला हाकलल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना जुहू चौपाटी येथे घडली. या हल्ल्यात अर्जुन गिरी हा गंभीर जखमी झाला असून त्याचा हाताचा अंगठा कापला गेला. या प्रकरणी ओंकार मनोहर मुखिया ऊर्फ ओंकार शर्माला जुहू पोलिसांनी अटक केली. त्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार अर्जुन गिरी हा दिल्ली येथे राहतो. तो एका ट्रेडिंग कंपनीत काम करतो. घटनेच्या दोन दिवस अगोदर मुंबई फिरण्यासाठी तो आला होता. रविवारी अर्जुन हा मित्रांसोबत जुहू चौपाटीवर गेला होता. जुहू चौपाटीवर त्याने, त्याच्या मित्राने खाद्यपदार्थ खाल्ले. त्यानंतर एका खाद्यपदार्थ स्टॉलवर असलेला  कुत्रा हा अर्जुनच्या अंगावर गेला. कुत्रा अंगावर आल्याने अर्जुन हा घाबरला. त्याने कुत्रा हाकलण्यासाठी जवळ असलेली खुर्ची उचलून कुत्र्याला हाकलण्याचा प्रयत्न केला.

काय झाला वाद?

अर्जुन हा कुत्रा हाकलत असल्याचे ओंकारने पाहिले. कुत्र्याला का हाकलले यावरून अर्जुन आणि ओंकारमध्ये वाद झाला. त्यानंतर ओंकार हा एका स्टॉलवर गेला. त्याने तेथून चाकू उचलून अर्जुनवर वार करण्यास सुरुवात केली. त्यात अर्जुनचा डाव्या हाताचा अंगठा कापला गेला. जखमी झालेल्या अर्जुनला त्याच्या मित्राने कूपर रुग्णालयात नेले. त्यानंतर त्याने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडल्या प्रकाराची माहिती जुहू पोलिसांना दिली. अर्जुनच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा दाखल होताच ओंकारच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. त्याला अवघ्या तीन तासांत ताब्यात घेऊन अटक केली. ओंकार हा जुहू परिसरात राहत असून तो प्राणीप्रेमी आहे.