निळय़ा पूररेषेत रामकाल पथ बांधकामास गोदाप्रेमीचा विरोध

निळ्या पूररेषेतील बांधकामाला न्यायालयाने बंदी घातली असतानाही शासन रामकाल पथाचे काम नैसर्गिक जलस्रोतात करणार आहे, त्याला गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी विरोध केला आहे.

सिंहस्थ कुंभमेळय़ाच्या पार्श्वभूमीवर शंभर कोटी रुपयांचा रामकाल पथ नाशिक येथे साकारला जाणार आहे. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, निळ्या पूररेषेत कुठलेही बांधकाम करण्याला विरोध कायम राहील. न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, हीच आमची मागणी आहे. मात्र, महापालिका वारंवार त्याच चुका करीत आहे, असेही देवांग जानी म्हणाले. महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन ते निदर्शनास आणून देऊ, असेही त्यांनी सांगितले.

पालिकेने काँक्रिटीकरण करून गोदावरी नदीवरील श्री रामपुंड, लक्ष्मणपुंड, सीतापुंड, धनुषपुंड येथील जिवंत झरे दाबले आहेत.  रामकाल पथ म्हणजे प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा आहेत. त्यामुळे प्रकल्प अवश्य राबवावा. सोबतच पुंडांमधील झरे पुनर्जीवित करून हा भाग काँक्रिटीकरणमुक्त करणे आवश्यक आहे.