
मिंधे सरकारच्या काळात राबवलेल्या मोठय़ा योजनांची अल्पावधीतच वाताहात उडाली आहे. एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील बस स्थानकात राज्यातील पहिले वातानुकूलित विश्रांतीगृह सुरू केले. हे विश्रांतीगृह साडेतीन महिन्यांतच ‘खुराडे’ बनले आहे. विश्रांतीगृहामध्ये स्वच्छतेचा पुरता फज्जा उडाला असून एसीदेखील बंद आहे. त्यामुळे थकलेल्या चालक-वाहकांना इथे सुखाची झोप दूरचीच गोष्ट झाली आहे.
मिंधे सरकारने गाजावाजा करीत 31 ऑक्टोबर 2024 रोजी एसटीचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल बस स्थानकात पहिले वातानुकूलित विश्रांतीगृह सुरू केले, मात्र विश्रांतीगृहाची योग्य देखभाल ठेवण्याकडे डोळेझाक केली. त्यामुळे साडेतीन महिन्यांतच विश्रांतीगृहाची अवस्था कोंबडय़ांच्या खुराड्यासारखी झाली आहे. तळमजल्यापासून ते प्रवेशद्वार, स्वच्छतागृहापर्यंत सर्वच ठिकाणी स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
राज्यभरातील एसटी आगारांतून बस आणणारे 300 चालक-वाहक तसेच मुंबई सेंट्रल आगारातील 100 चालक-वाहकांसाठी जवळपास 90 लाख रुपये खर्चून दोन ठिकाणी अत्याधुनिक विश्रांती कक्ष बांधले. त्यात टू टिअर बॅक बेडसह करमणूक कक्ष, जेवणासाठी स्वतंत्र हॉल व प्रसाधनगृहाची व्यवस्था केली. सर्व काही सुस्थितीत व टापटीप असेल, असा दावा मिंधेंनी उद्घाटनावेळी केला, पण तीन महिन्यांत दाव्याचा फज्जा उडाला.
परिचारक नियुक्तीचा अर्ज धूळ खात
विश्रांतीगृहाच्या ठिकाणी परिचारकची नियुक्ती करण्याची मागणी वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहे. मुंबई सेंट्रल आगाराच्या महाव्यवस्थापकांनी परिचारक नियुक्तीसाठी एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांकडे अर्ज केला आहे. तो अर्ज त्यांच्याकडे कित्येक दिवसांपासून धूळ खात पडून आहे.
स्वच्छतेबाबत टोलवाटोलवी
विश्रांतीगृहातील स्वच्छतेच्या जबाबदारीबाबत एसटीचे अधिकारी व चालक-वाहक एकमेकांवर टोलवाटोलवी करीत आहेत. विश्रांतीगृहात येणारे चालक-वाहक स्वच्छता राखत नाहीत, असे एसटी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी चालक-वाहकांच्या मते महामंडळच स्वच्छतेबाबत उदासीन असल्याचे बोलले जात आहे.