
उल्हासनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी वृद्ध मराठी नागरिकासोबत उद्धट वागणाऱ्या मुजोर आरपीएफ जवानाचा रेल कामगार सेनेने सोमवारी तीव्र निषेध केला. या वेळी संबंधित जवानावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. तसेच यापुढे मराठी भाषेचा अपमान खपवून घेणार नाही, त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा देत रेल कामगार सेनेतर्फे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ मंडल सुरक्षा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
उल्हासनगर येथे आरपीएफ जवान चौहान याने ‘मला मराठी बोलता येत नाही. जा कोणाकडे जाऊन तक्रार करायची त्याच्याकडे कर’ अशा प्रकारचे उद्धट वर्तन तिकीट खरेदीसाठी आलेल्या वृद्ध प्रवाशासोबत केले. या प्रकाराची गंभीर दखल घेत रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते विनायक राऊत तसेच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रेल कामगार सेना आणि मध्य रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीमार्फत संबंधित जवानावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ मंडल सुरक्षा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अनेक ठिकाणी मराठी भाषेचा अपमान केला जात आहे. यापुढे मराठी भाषेचा अपमान कदापि सहन करणार नाही. मराठीच्या अपमानाची पुनरावृत्ती घडताच कामा नये, तसे घडल्यास गंभीर परिणाम होतील व त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनातून दिला.
निवेदनासोबत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्या निर्णयाचा जीआर जोडण्यात आला. सर्व जवान व अधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना द्या, अन्यथा असे प्रकार घडत राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, अशी कल्पना देण्यात आली. या वेळी रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, मध्य रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष शैलेश शिंदे, सरचिटणीस विजय शिरोडकर, भरत शर्मा, प्रतीक गायकर, संजय रोहित, संजय माने उपस्थित होते.