वरिष्ठांनी फटकारणे हे गुन्हेगारी कृत्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजय करोल आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांचे म्हणणे ऐकणे हा एक कामाचा भाग आहे, असे म्हटले आहे.

कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना फटकारले किंवा झापले असेल तर ते गुन्हेगारी कृत्य ठरत नाही. कारण वरिष्ठ मुद्दामहून त्याचा अपमान करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना दिला. एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांविरोधात याचिका दाखल केली होती, परंतु ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. जर या प्रकरणांमध्ये वरिष्ठांविरोधात कारवाई केल्यास त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. तसेच कार्यालयातील शिस्तीच्या वातावरणावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने नमूद केले. सुप्रीम कोर्टाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने म्हटले की, अपशब्द, असभ्य, असंस्कृतपणा हे 504 नुसार हेतूपूर्वक अपमान मानले जाऊ शकत नाही. कलम 504 हे शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान केल्याच्या संदर्भात आहे. या प्रकरणांमध्ये दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. हे कलम आता नव्या भारतीय न्याय संहितेच्या कलम 352 झाले आहे.

प्रकरण काय आहे…

हे प्रकरण 2022 मधील असून राष्ट्रीय मानसिक दिव्यांग सशक्तिकरण संस्थेच्या प्रभारी संचालकांवर एका सहाय्यक प्राध्यापकाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. संचालकाने कार्यालयातील अन्य कर्मचाऱ्यांसमोर झापल्याने माझ्या भावना दुखावल्या आहेत, असे म्हटले होते. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झापले त्याला जाणीवपूर्वक अपमान म्हटले जाऊ शकत नाही. कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी पूर्ण निष्ठsने कर्तव्य पार पडण्याची अपेक्षा करणे हे वरिष्ठांचे कर्तव्य आहे, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले.