चर्चा तर होणार…! धनंजय मुंडेंबाबत पत्रकारांचा ‘तो’ प्रश्न अन् चंद्रकांत पाटलांनी थेट हातच जोडले, नक्की काय घडलं?

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला बेड्या ठोकण्यात आल्या. या हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप होत आहेत. दुसरीकडे करुणा मुंडे प्रकरणातही ते अडचणीत सापडले असून न्यायालयाने त्यांनी नोटीसही धाडली आहे. त्यामुळे विरोधकांबरोबरच सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अजित पवार यांनी यावर भाष्य करताना स्वतःचा दाखला देत धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी सूचित केले आहे. याच संदर्भात भाजप नेते आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी केलेल्या कृतीची जोरदार चर्चा आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. त्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी चंद्रकांत पाटील पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारला. मात्र यावर चंद्रकांत पाटील यांनी फक्त हात जोडले आणि काहीही न बोलता निघून गेले.

राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावे – अजित पवार

दरम्यान, महायुतीतील धुसफूस सातत्याने समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीतील पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. अजित पवार गटाकडून स्वबळाची तयारी सुरू असून मिंधे गटही चाचपणी करत आहे. मात्र याबाबत चंद्रकांत पाटील यांनी सावध प्रतिक्रिया देत अजून निवडणुकांना बराच कालावधी असून महायुतीतील नेत्यांनी स्वबळाची वक्तव्य टाळावीत असे म्हटले.

महायुतीतील नाराजीनाट्याचा पुढचा अंक; अजितदादांसमोर महिला आमदारानं वाचला तक्रारींचा पाढा, मिंधे गटावर आरोप