
पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर भव्य महानाटय़ाचे आयोजन काशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात बुधवार, 19 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. विश्वमांगल्य सभा आयोजित आणि नागपूरहून आलेल्या 45 कलावंतांच्या सादरीकरणातून देवी अहिल्याबाई होळकर यांच्या अद्वितीय कार्यावर या महानाटय़ात प्रकाश टाकला जाणार आहे.
अहिल्याबाई होळकर या केवळ मालका घाटाच्या राणी नव्हत्या तर त्या हिंदुस्थानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानासाठी झटणाऱया एक आदर्श नेत्या होत्या. काशी, गयासारख्या धार्मिक स्थळांचे पुनर्निर्माण, शेकडो मंदिरे, घाट आणि धर्मशाळांचे बांधकाम तसेच जलसिंचन आणि व्यापार मार्गांच्या सुधारणा यांसाठी त्यांचे कार्य अद्वितीय होते. मुंबई महानगर प्रदेशासारख्या वेगाने विकसित होणाऱया शहराला सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीची जाणीव करून देण्यासाठी हे महानाटय़ महत्त्वाचे ठरणार आहे. अहिल्याबाई होळकरांचे कर्तृत्व आणि नेतृत्व समाजात नवे विचार रुजवण्यासाठी प्रेरणा देणारे ठरणार आहे.
मुंबईकरांनो, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा!
विश्वमांगल्य सभा अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी जन्ममहोत्सवाच्या निमित्ताने हे भव्य आयोजन करीत असून मुंबईकरांनी या ऐतिहासिक अनुभवाचा लाभ घ्यावा आणि हिंदुस्थानी संस्कृतीच्या पुनर्जागरणात आपला सक्रिय सहभाग नोंदवा. हे महानाटय़ म्हणजे केवळ एक नाटय़प्रयोग नसून तो हिंदुस्थानच्या उज्ज्वल इतिहासाला वंदन करण्याचा सोहळा आहे. चला, आपण सर्व जण याचे साक्षीदार होऊ या, असे आवाहन विश्वमांगल्य सभेच्या मुंबई प्रांत कार्यकारिणीने केले आहे.