राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावे – अजित पवार

सिंचन घोटाळ्यावरून आरोप झाले तेव्हा मी राजीनामा दिला होता; कारण माझ्या बुद्धीला ते पटले नाही. मी स्वच्छ पद्धतीने काम केले होते. त्यामुळे आता राजीनामा द्यायचा की नाही ते धनंजय मुंडे यांनी ठरवावे, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणांसंदर्भातील प्रश्नावर मांडली.

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. करुणा मुंडे प्रकरणातही ते अडचणीत सापडले असून विरोधकांबरोबर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यातच अजितदादा गटातील काही नेत्यांचा राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन घोटाळाप्रकरणी स्वतःचा दाखला देत धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यासाठी सूचित केले आहे.

धनंजय मुंडे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, यात माझा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनीदेखील सांगितले आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. आम्ही अजिबात कोणाला वाचवणार नाही. एखाद्यावर आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्येदेखील नाव आले तरी आपण कारवाई करणार आहोत.