
रात्रीच्या वेळेस वांद्रे रिक्लेमेशन ते पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे मोटरसायकलवर रेस खेळणाऱ्या स्टंटबाजांना पोलिसांनी दणका दिला. पोलिसांनी कारवाई करून एकूण 52 मोटरसायकली जप्त केल्या. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी 14 जणांविरोधात गुन्हा नोंद केला.
वांद्रे ते पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे काही तरुण रात्रीच्या वेळेस जीवघेणे स्टंट करत रेस खेळतात. अशा स्टंटबाजांवर पोलीस वेळोवेळी कारवाई करत असतात. वांद्रे रिक्लेमेशन ते खेरवाडी असे काही जण मोटरसायकलची रेस खेळत असल्याची माहिती दक्ष नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
त्यानंतर वांद्रे आणि खेरवाडी पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी लावून रेस खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एकूण 52 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. रेस खेळल्याप्रकरणी 14 जणांविरोधात वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला.