99 हजारांत आयुष्यभर अनलिमिटेड पाणीपुरी! नागपुरात पाणीपुरीवाल्याच्या भन्नाट ऑफर्स

नागपूरमधील विजय मेवालाल गुप्ता या पाणीपुरी विव्रेत्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 99 हजार रुपयांत ‘लाईफटाईम अनलिमिटेड’ पाणीपुरी ही अनोखी योजना सुरू केली आहे. तसेच 151 पाणीपुरी खाणाऱया व्यक्तीस 21 हजारांचे बक्षीस मिळणार आहे. ऑरेंज सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपुरात या ऑफरची भलतीच चर्चा रंगली आहे. एक रुपयापासून 99,000 रुपयांपर्यंत ऑफर्स आहेत. 1 रुपयाच्या ऑफरमध्ये महाकुंभ ऑफर दिली जाते. या ऑफरमध्ये एका ग्राहकाने एकाचवेळी 40 पाणीपुरी खाल्ल्या तर त्याला फक्त एक रुपया द्यावा लागेल, असे पाणीपुरी विव्रेते गुप्ता यांनी सांगितले.

महिलांसाठी लाडकी बहीण योजना

गुप्ता पुढे म्हणाले की, महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ असून या योजनेत महिलांना केवळ 60 रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी खाता येणार आहे. तर इतरांना 95 रुपयांत अनलिमिटेड पाणीपुरी मिळेल. पाणीपुरी, शेवपुरी किंवा भेळपुरी आठवडय़ाच्या ऑफरमध्ये 600 रुपयांत अनलिमिटेड मिळेल. तर मासिक ऑफरमध्ये अनलिमिटेड पदार्थांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 2000 रुपये मोजावे लागतील. आगामी काळात पाणीपुरीसाठी वर्षाला पाच ते सात लाखांचा खर्च होऊ शकतो. आम्ही फॅमिली मेंबरशीप घेणायांना 10 टक्के सवलतदेखील देत आहोत, असे गुप्ता म्हणाले.