अपघातसमयी मदत करणाऱ्या तरुणांचा ‘मृत्युंजयदूत पुरस्कार ‘ने गौरव,  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा अनोखा उपक्रम

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे जाळे वाढल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक व वाहनांची संख्या गतीने वाढत आहे. त्याचप्रमाणे अपघातही होत आहेत. अशा स्थितीत अपघातात जखमींना मदत करण्यासाठी धावून येणाऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अतुल देशपांडे यांनी ‘मृत्युंजयदूत पुरस्कार’ देऊन सन्मान करण्याची अनोखी योजना सुरू केली आहे.

या योजनेंतर्गत वैभव दत्तात्रय भोई व विनोद भास्कर भोसले या दोन तरुणांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

वैभव भोई (रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर) या तरुणाने मोहोळजवळ खासगी प्रवासी बसच्या झालेल्या अपघातात 15 जखमी प्रवाशांना मदत केली होती. पायात चप्पल नसताना जीवाची पर्वा न करता, बसच्या काच फोडून बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले व येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयाकडे पाठवून दिले होते.

त्याचप्रमाणे विनोद भोसले (रा. लवंग, ता. माळशिरस) या तरुणाने टेंभुर्णी ते अकलूजदरम्यान असलेल्या जांभूळबेट पाटीजवळ एक इसम अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी होऊन विव्हळत पडलेला होता. तेथे बघ्यांची गर्दी जमली होती; पण कोणीही मदतीस पुढे येत नव्हते. विनोद भोसले याने प्रसंगावधान साधत 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली व जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या दोघांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ‘मृत्युंजय दूत पुरस्कार’, प्रशंसापत्र व गुच्छ देऊन सन्मान केला.

नागरिकांनी प्रसंगावधान साधून मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.