सांगली शहरात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत, वर्षभरात 4300 जणांवर हल्ला

सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे वाहनधारकांचे अपघात व बालकांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आठ वर्षांपूर्वी भटक्या कुत्र्यांची संख्या 14 हजारांच्या घरात होती. आता ती 23 हजारांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे 4 हजार 300 जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. तर, भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी दररोज सरासरी चार-पाच याप्रमाणे वर्षाला सुमारे दीड हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. तरी कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यामुळे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी आता दहशत निर्माण केली आहे.

सांगली महापालिका क्षेत्रात भटकी कुत्री टोळीने फिरतात, त्यामुळे अनेक ठिकाणी दुचाकी वाहनांचे अपघात झाल्याचे दिसून येते. बालकांवरदेखील हल्ले होत आहेत. मंगळवारी सांगली-मिरज रस्त्यावरील सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलसमोर भटके कुत्रे आडवे आल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला होता. तर, महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्रासमोरच एका बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे मनपा क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची दहशत पुन्हा अधोरेखित झाली आहे. महापालिका क्षेत्रात 2016 मध्ये साधारण 14 हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचे पशुसंवर्धन व प्राणी मित्र संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत. पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरून घरी परतणाऱ्यांना भटक्या कुत्र्यांची धास्ती असते. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे अशा घटना वाढल्या आहेत. अनेकांची अवस्था गंभीर झाली होती. कुत्रे चावण्यामुळे रेबीज होण्याची भीती असते. या भीतीपोटी प्रत्येकजण अँटी रेबीजची लस घेण्यासाठी मनपाच्या आरोग्य केंद्रात धाव घेत आहेत. मनपा क्षेत्रात जानेवारी ते डिसेंबर 2024 या काळात सुमारे 4 हजार 300 जणांनी कुत्र्यांनी हल्ला केला आहे. त्यांना अँटी रेबीजची इजेक्शन मनपाच्या वतीने देण्यात आली आहेत.

भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मनपाची डॉग व्हॅन सांगली व मिरज शहरांत आहे. पण, डॉग व्हॅन दररोज फिरत नाही. काही ठिकाणी डॉग व्हॅन गेल्यानंतर वासाने कुत्री अगोदरच पळून जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनपा क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची संख्या दररोज वाढत चालली आहे. यावर आता नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

इंजेक्शनचा साठा नसल्याने निर्बीजीकरणाचा वेग मंदावला

सन 2018 मध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी एजन्सी नेमली. मात्र, त्यांचे काम समाधानकारक न झाल्याने महापालिकेने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली. निर्बीजीकरण करण्यापूर्वी भुलीचे इंजेक्शन देणे आवश्यक असते. इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने निर्बीजीकरणाचा वेग मंदावत आहे. दररोज साधारण चार ते पाच कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते.

दररोज सरासरी चार कुत्र्यांचे निर्बीजीकरण

■ भटक्या कुत्र्यांची एक मादी चार पिलांना जन्म देते. त्यामुळे महापालिका क्षेत्रात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पाश्र्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी चार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण महापालिकेकडून करून कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवली जात आहे. कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांचे निर्बीजीकरण केले जाते. तरीदेखील कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.