![ganesh naik eknath shinde](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/08/ganesh-naik-eknath-shinde-696x447.jpg)
मिंधे गटात अस्वस्थता निर्माण करणारे राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची तारीख फिक्स झाली आहे. 24 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असल्याने मिंध्यांना थेट खुले आव्हान देण्याची तयारी भाजपने केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू झाली आहे.
मिंधे गटावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणून गणेश नाईक यांची निवड केली आहे. दरम्यान नाईक यांची वनमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी कोपरी येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाषणात बोलताना ठाण्याचा कारभार सुधारायचा असल्याने जनता दरबार घेणार अशी घोषणा नाईकांनी केली होती. त्यांनतर राजकीय वातावरण चांगले तापले. दरम्यान जनता दरबार कोणीही कुठेही घेऊ शकतो, महायुतीच्या मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी करत मी लवकरच जनता दरबार घेणार असल्याची आठवण पुन्हा करून दिली असल्याने ठाण्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.
भाजपच्या माजी नगरसेवकांचा आग्रह
गेल्या अडीच वर्षांत ठाणेकरांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यातच मिंधे गटाच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे चालत नसल्याने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या कोणाच्या दरबारी मांडायच्या, असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडला आहे. त्यामुळे नाईकांनी पालघरसह ठाण्यातही जनता दरबार घ्यावा, असा आग्रह भाजपच्या माजी नगरसेवकांनी नाईकांकडे धरला होता.