
>> तुषार प्रीती देशमुख
कोणताही पदार्थ खाण्याआधी तो नजरेने चाखला जातो असे म्हणतात. म्हणजेच पदार्थाचे सादरीकरण अत्यंत महत्त्वाचे असते. जेवणाच्या पंगतीत बसल्यावर पानात वाढलेल्या रंगसंगतीच्या विविध पदार्थांनी जेव्हा ताट सजवले जाते तेव्हा क्षणात भूक चाळवते व त्या जेवणाचा आस्वाद चवीने घेतला जातो. पण पाककृती लेखनामधून त्या पदार्थाचा आस्वाद शब्दांतून देणारी लेखिका शुभा प्रभू साटम!
सध्याच्या काळात कोणत्याही रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये एखादा पदार्थ ऑर्डर केला की, त्या येणाऱया डिशचे सादरीकरण पाहून आपली भूक जास्त चाळवली जाते. या सादरीकरणाला `प्लेटिंग’ असे म्हणतात. ज्याला खाद्यसंस्कृतीमध्ये पदार्थाबरोबर खूप महत्त्वाचे मानले जाते. पण आमची शुभाताई एखाद्या पदार्थाचे तिच्या लिखाणातून असे काही वर्णन करते की, ती पाककृती वाचून संपेपर्यंत तो पदार्थ आपल्या पोटात गेलेला असतो आणि आपण त्या पदार्थाचा आस्वाद घेत आहोत असे आपल्याला जाणवते. पण त्या पदार्थाची पाककृती तिने लिहिलेल्या पद्धतीने वाचायला पाहिजे. हीच तर तिच्या पाककृती लिखाणाची ताकद!
माझी मैत्रीण भक्ती सोमण हिच्यामुळे शुभाताईची ओळख झाली. आम्ही एका व्हाट्सआप ग्रुपमध्ये एकत्र असल्यामुळे शुभाताईने लिहिलेले अनेक पदार्थ वाचण्याचे भाग्य मला लाभले. दरवेळी वाचताना त्या पदार्थाचा आस्वाद घेत असल्याची जाणीव झाली. खाद्यसंस्कृतीमध्ये कोकणातल्या पदार्थांना एक वेगळाच दर्जा आहे. ते त्या पदार्थांच्या सोप्या पाककृती व चवीमुळे. हेच लुप्त होत चाललेले चविष्ट, पौष्टिक पदार्थ लोकांसमोर आपल्या खमंग, खुसखुशीत लेखन पद्धतीने मांडून त्यांना ते करण्यास ती नेहमीच प्रेरित करत असते. शुभाताई पारंपरिक पदार्थांबरोबरच देश-विदेशातल्या अनेक प्रांतांतील वेगवेगळे पदार्थ करून पाहत असते. हे सर्व पदार्थ करण्याआधी ती अनेक पुस्तकांचे वाचन करून त्यातील योग्य पाककृती लिहून काढते व त्या पदार्थांची योग्य चव होईपर्यंत अनेकदा ते पदार्थ करून पाहते. शुभाताई तिचे पती चारूहास साटम यांच्यासोबत अनेकदा वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रांतांतले विविध पदार्थ खाण्यासाठी जात असते. त्या पदार्थांमध्ये कोणते घटक वापरून तो पदार्थ केलाय याबद्दल ती शेफबरोबर चर्चादेखील करते. तिला अनेक पदार्थ घरी बनवून पाहण्यात खूप हौस असते. त्यासाठी लागणारी सामग्री ती स्वत बाजारात जाऊन चोखंदळपणे निवडून आणते. मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीबरोबरच ती तिच्या मुलासाठी वेगवेगळ्या देशांतले ऑथेंटिक पदार्थही करून खाऊ घालते. त्या पदार्थांसाठी लागणारी सामग्री घेताना ती कधीच कॉम्प्रमाईज करत नाही. तिचं हेच म्हणणं आहे की, पदार्थ मराठमोळा असो वा विदेशी, ज्या पदार्थाला जी सामग्री वापरली जाते तीच सामग्री वापरून तो पदार्थ बनवला तर त्याची चव योग्य बनते व तो पदार्थ रुचकर बनतो.
शुभाताईच्या आई उमा प्रभू यांनादेखील वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्यामध्ये आनंद मिळायचा. उमाताईंनी 80-90 च्या दशकात भारतातील वेगवेगळ्या प्रांतांतले पदार्थ तसेच चायनीज पदार्थ, केकचे वेगवेगळे प्रकार या सगळ्याचे प्रशिक्षण घेऊन त्या ते सर्व प्रकार मुलांसाठी घरी बनवायच्या. हे सर्व लहानपणापासून शुभाताई पाहताना व आईला थोडी मदत करताना तिच्यातही ते सर्व गुण रुजले. त्यामुळे शुभाताईमध्ये ती आवड निर्माण झाली. जी तिने पुढे वाढवत आपल्या लेखणीमधून सगळ्यांची मने जिंकली. शुभाताईने लिहिलेल्या अनेक पदार्थांच्या पाककृती अनेक वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये छापल्या गेल्या आहेत. अनेकदा तिचा सत्कार करून तिच्या पाककृतींना मानाचा दर्जा लाभला आहे. पदार्थ कोणताही असो, तो पदार्थ करण्याआधी त्यात वापरण्यात येणाऱया सामग्रीची रंगसंगतीदेखील ती प्रामुख्याने पाहते.
रुचकर मेजवानी या यूटय़ूब चॅनलवर शेफ म्हणून पाककृती दाखवत असताना कोकणातली थाळी दाखवण्याचे ठरवले. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता शुभाताईला फोन लावला व तिच्याकडून थाळीमध्ये असणाऱया पाककृतींची माहिती घेतली व तसेच पदार्थ सादर केले होते. त्याला सगळ्यांचाच भरघोस प्रतिसाद मिळाला हे सर्व श्रेय शुभाताईचेच होते. ती म्हणते, फ्युजनच्या नावाखाली पदार्थांची वाट लावू नये. जे पदार्थ पारंपरिक असतात त्याला हात न लावता योग्य पद्धतीने तयार केले तर तो पदार्थ नक्कीच आवडतो. त्यातलीच एक तिने दिलेल्या एका पदार्थाची तिच्या लेखन पद्धतीमधील सोबत दिलेली पाककृती जी आहे देशी वेगन सूप. (ताक वगळल्यास) कोकणात असे कढण थंडीत, पावसाळ्यात करतात. देशावर पण होते. बाळंतीण स्त्राr, लहान मुले, ज्येष्ठांसाठी उपयुक्त आणि पौष्टिक. पारंपरिक कृतीचे हेच वैशिष्टय़ असते. स्वस्त व सोप्पे. ही पाककृती वाचल्यावर कशी वाटली? आहे ना हटके स्टाईल! अशी ही शुभा प्रभू साटम पाककृतीची सुगरण लेखिका. जी फक्त घरच्यांसाठीच नाही तर सगळ्यांसाठी पदार्थ बनवते व त्यावर लिखाण करण्यात रमते.
कढण – देशी सूप
साहित्य : मोड आलेले मूग/ हरभरा/ कुळीथ/मटकी कोणतेही धान्य, ओले खोबरे/ नारळ दूध/ ताक, आले, मिरची, लसूण.
कृती : कडधान्य धुऊन, कुकरमध्ये थोडा कांदा (ऐच्छिक), हिरवी मिरची, आले-लसूण (ऐच्छिक) हळद घालून सणसणीत शिटय़ा घ्याव्यात. मूग, कुळीथ असल्यास कमी. हरभरे इत्यादी असल्यास जास्त. अगदी मऊ शिजायला हवेत. गार झाले की वाटून/ प्aह् ंतही् ने घोटून घ्यावे. शक्यतो गाळू नये. लहान मुलांना द्यायचे तर मग गाळावे. सरसरीत करून उकळायला ठेवावे. उकळी आली की त्यात नारळ दूध/ ताक जे घालणार ते घालून व मीठ, गूळ घालून एक उकळी घ्यावी. आवडत असल्यासवरून तूप, जिरे, हिंग, लसूण यांची फोडणी द्यावी.
[email protected]
(लेखक युटय़ूब शेफ आहेत.)