
>> चंद्रसेन टिळेकर
कुठलेही पाप केले तर या देशात नदीत केवळ डुबकी मारून पावन होता येते अशी दृढ श्रद्धा आहे. या श्रद्धेपायी असंख्य लोक पुंभमेळ्याला जात आहेत. कुंभमेळ्यातील दृश्ये पाहिली की आपल्या देशातील अध्यात्माची उपासना, श्रद्धा यांची जागा अंधश्रद्धेने घेतली आहे हे लगेच दिसते.
वचिकपणा, चिवटपणा, लोचटपणा हे गुणविशेष एका अर्थी एकमेकांचे भाऊबंदच म्हणायला पाहिजेत. त्यामुळे `उडदामाजी काळे गोरे काय निवडावे’ अशी आपली परिस्थिती होते, परंतु असे असले तरी ते केव्हा एकमेकांपासून फटकून वागतील अन् भाऊबंदकी करतील ते मात्र काही सांगता येत नाही. लवचिकपणा, चिवटपणा हे खरे तर सरळ सरळ सद्गुणच म्हटले पाहिजेत, पण त्यांचेही काही खरे नसते. निरनिराळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती माहीत असूनही त्या सर्वांना स्वतच्या तत्त्वांना मुरड घालून एखाद्या सत्कार्यात सामील करून घेणे हे झाले लवचिकपणाचे लक्षण. त्याचे कौतुक केलेच पाहिजे, परंतु स्वार्थापोटी आपल्या सद्गुणांना मुरड घालून लाभ पदरात पाडून घेणे याला मात्र नक्कीच लवचिकपणा म्हणता येणार नाही. चिवटपणा आणि लोचटपणा हे वरपांगी जरी एकमेकांचे भाऊ भाऊ वाटले तरी खरे ते सावत्र भाऊच ! सातत्याने अपयश येत असले तरी कष्ट करीत राहणे, झगडत राहणे, संघर्ष करणे हा चिवटपणाचा आत्माच म्हणावा लागेल. दुरून पाहणाऱयाला तिथे लोचटपणाचा भास होईल, पण ते अप्रबुद्धपणाचे ठरेल! लोचटपणाला कसलीही लाज नसते. त्यामुळे त्याला भाऊबंद तसे कोणी नसतातच आणि त्याचे सोयरसुतकही लोचटपणाला नसते. असा गुणविशेष असलेली मंडळी आपल्याला राजकीय क्षेत्रासह सर्व क्षेत्रांत आढळतात. म्हणूनच सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध होऊनही एखादा लोकप्रतिनिधी, नेता, मंत्री आपली खुर्ची सोडत नाही, सत्तेतून पायउतार होत नाही. यासाठी जो कमालीचा लोचटपणा लागतो तो त्यांच्या अंगी मुरलेला असतो. हे भाष्य विद्यमान परिस्थितीतील कुणाही व्यक्तीला, नेत्याला डोळ्यांसमोर ठेवून केलेले नाही याची कृपया नोंद घेणे आवश्यक आहे. असे असले तरी राजकीय क्षेत्रातीलच दोन महान व्यक्तींनी दाखवलेल्या बाणेदार प्रसंगांची आठवण इथे झाल्याशिवाय राहत नाही.
पहिले उदाहरण आहे ते म्हणजे आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्राचे कंठमणी म्हणून गौरविलेले पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील अर्थमंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय वंशाचे म्हणून नावाजले गेलेले सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख म्हणजेच सी.डी देशमुख यांचे! मुंबई महाराष्ट्राला देऊन संयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या विरोधात पंतप्रधान पंडित नेहरू आहेत हे लक्षात आल्यावर “महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनात आकस आहे” असे पंडित नेहरूंना त्यांच्या तोंडावर सांगून तडकाफडकी राजीनामा देणारे चिंतामणराव देशमुख ! आपल्या मंत्रीपदाचे मानधन केवळ एक रुपया घेणारे हेच ते महाराष्ट्राचे सुपुत्र चिंतामणराव.
सध्याच्या आपल्या बेचाळीस पिढय़ांच्या उत्कर्षात मग्न असलेल्या राजकारणी मंडळींना हा वेडेपणाच वाटेल, पण अशा वेडय़ा राजकारणी महंतांनीच राजकीय क्षेत्रातील नीती जपली आहे, पावित्र्य जपले आहे हे विसरून कसे चालेल? दुसरे निस्पृहतेचे, निरिच्छेचे उदाहरण आहे ते म्हणजे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्राr यांचे ! ते 1956 साली पं. नेहरूंच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. लागोपाठ दोन रेल्वे अपघात होताच लालबहादूर शास्त्री यांनी कुणी न मागताच आपला राजीनामा दिला. पहिला राजीनामा नेहरूंनी स्वीकारला नाही, पण दुसरा मात्र शास्त्री यांच्या आग्रहास्तव नेहरूंना स्वीकारावाच लागला. खोऱयाने पैसे ओढण्यात धन्यता मानणाऱया आपल्या सर्वच क्षेत्रांतील दिग्गजांना यातच म्हणजे धनसंपदा मिळवण्यातच आयुष्याची इतिश्री आहे, मोक्ष आहे असे वाटत असते. त्यासाठी म्हणजे मोक्षासाठी त्यांना गंगेत डुबकी घेण्याची गरज वाटली नाही. खरं तर भ्रष्टाचारासारखेच काय, पण कुठलेही पाप केले तर या देशात नदीत केवळ डुबकी मारून पावन होता येते अशी दृढ श्रद्धा आहे. अख्ख्या विश्वात पाप धुण्याची ही सोय कुणाला, अगदी पुढारलेल्या देशांनाही करता आलेली नाही. मात्र मोक्ष मिळवायचा असेल तर म्हणे गंगेत केवळ डुबकी घेऊन चालत नाही, तर चक्क मरावे लागते. तसे केले तर केंद्र शासन प्रायोजित बागेश्वर बाबा त्या मोक्षाची हमखास हमी देतात. अशा पद्धतीने आजपर्यंत एक हजार भाविक कुंभमेळ्यात मोक्षाला गेले आहेत असे समजते.
हे थोडे विषयांतर होतेय याची कल्पना आहे, परंतु विश्वाला चकीत करणारा एवढा मोठा कुंभमेळा स्वदेशी भरलेला असताना आणि तो सोहळा `याचि डोळा याचि देही’ पाहायला मायंदळ परदेशी येत असताना आपण नर्मदेतल्या किंवा गंगेतल्या गोटय़ासारखे कोरडे राहून कसे चालेल? कुंभमेळ्यातील दृश्ये पाहिली की, लेखाच्या प्रारंभी म्हटल्याप्रमाणे लवचिकपणा, चिवटपणा, लोचटपणा इथे बराचसा कामी येतो, पण त्यासाठी कमालीचा नि:संगपणा मात्र हवा. या नि:संगपणासाठी सारी ज्ञानेंद्रिये बंद करता आली पाहिजेत आणि ते तर आपल्या देशवासीयांना सहजगत्या जमते. सारे जग विज्ञानाची आराधना करीत असताना आपण अध्यात्माची उपासना करतो ती काय उगाच? शिवाय, “तुमचे विज्ञान संपते तिथे आमचे अध्यात्म चालू होते” अशी शेखी मारावी ती आपणच! उगाचच का कोटय़वधी आपले देशवासीय साऱया हालअपेष्टा सोशीत कुंभमेळ्याला हजेरी लावतात? हौसेला मोल नसते तसे भक्तीलाही दृष्टी नसते. त्या आंधळेपणापायी रोज शेकडो भाविक एकमेकांना पायाखाली तुडवून काही अवयवांचा भार तरी कमी करतात, नाहीतर आपला पृथ्वीवरील भार कमी करून रम्य समजल्या गेलेल्या मोक्षाला तरी जातात. कुंभमेळ्याची ही महती तुकोबा आणि कुसुमाग्रज यांना समजू नये याबद्दल कुणालाही वैषम्य वाटेल. कुसुमाग्रज या मेळाव्याबद्दल काय म्हणतात तर…
व्यर्थ गेला तुका, व्यर्थ ज्ञानेश्वर
संतांचे पुकार, वांझ झाले ।
रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग
दंभ शिगोशीग, तुडुंबला ।।
तर तुकोबा त्वेषाने म्हणतात…
`आली सिंहस्थ पर्वणी
न्हाव्या भटा जाली धनी ।
अंतरी पापाच्या कोडी
वरी वरी बोडी डोई दाढी ।।
या लेखात आधी उल्लेखिलेला लवचिकपणा या दोघा महंतांनी न दाखवता आपल्या तत्त्वाला घट्ट चिटकून राहण्याचा चिवटपणा का बरे करावा? जाऊ द्या, थोरामोठय़ांच्या भांडणात आपण कशाला पडा? पोटापाण्यासाठी धावपळ करताना पाप करायला उसंत तरी कोणाला मिळते? तेव्हा कुंभमेळ्याला जायचा आटापिटा तरी कशाला करा? आपण आपले नळाखाली नाहीतर शॉवरखाली मनसोक्त आंघोळ करावी हे उत्तम! कुंभमेळ्याचा हा कुंभ आपल्या डोक्यावर नकोच!
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी
चळवळीशी निगडित आहेत.)