
>> आशा कबरे-मटाले
पावारी काही कामानिमित्ताने संध्याकाळी पुण्याला निघावं लागणार आहे म्हटल्यावर पुष्करला हायसं वाटलं. एरव्ही पावारची संध्याकाळ त्याची आवडती. धकाधकीचा आठवडा संपल्याची सुखावणारी जाणीव घेऊन येणारी. पण यंदाचा पावार नेहमीपेक्षा वेगळा होता. वैताग आणणारा `व्हॅलेंटाइन डे’ होता त्या दिवशी! बाहेर कुणासोबत जाण्याचा `पर्याय’ त्याला उपलब्ध नव्हता आणि घरातच लोळत फोनवर इतरांच्या व्हॅलेंटाइन डेच्या पोस्टी बघत त्याला वैतागून जायचं नव्हतं. पुष्करसारखीच अवस्था किमयाचीही.
व्हॅलेंटाइन सीझनच्या निमित्ताने रीलीज झालेला `लवयापा’ बघण्यासाठीही या आठवडय़ात तिला एकटीलाच थिएटर गाठावं लागलं. मित्रमैत्रिणींपैकी कुणालाच इंटरेस्ट नव्हता आणि ज्याच्यासोबत `जोडीने’ सिनेमाला जावं असा मित्र तिला अजुनतरी सापडला नव्हता. तिने नेहमीप्रमाणे एकटीने पिक्चर पाहून टाकला खरा, पण `आणखी एकदा एकटीच’ ही भावना या आठवडय़ात तिला जरा जास्तच गडद जाणवली. यालाही जबाबदार `व्हॅलेंटाइन डे’च होता. प्रेमाचं अवडंबर माजवणारा दिवस!
`प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’… मंगेश पाडगावकरांची ही कविता एका पिढीला मनोमन भावली होती. पण ही कविता भावणारी पिढी आता पालकांच्या भूमिकेत आहे आणि त्यांनी कितीही `तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ असं म्हटलं तरी सध्याच्या तरुणाईचा प्रेम आणि नात्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बराच बदललेला आहे हे त्यांनाही स्वीकारावंच लागतं. मुळात सोशल मीडियाच्या जमान्यात जगण्यातलं सगळंच कसं `हॅपनिंग’ आणि `फोटोंमधून शेअर करण्याजोगं’ असण्याचा ताण विशेषत: तरुण पिढीतले अनेक जण कळत-नकळत अनुभवत असतात. कुठलाही अनुभव पुरता अनुभवण्याच्या आत ते `स्टेटस’ आणि `स्टोरी’वर टाकावं लागतं आणि त्यासाठी ते `देखणं’ असावं लागतं! याचा दबाव `स्पेशल’ नात्यांवरही असतोच.
आजच्या तरुण पिढीतली बहुतेक मुलंमुली एकीकडे शिक्षण, करिअर आदी बाबतीत फोकस्ड असली तरी सोशल असण्याचा, मित्रमंडळींमध्ये स्वीकार होण्याचा भरपूर ताण ती सोसत असतात. बहुतेक जण `एकेकटं’ वा फार तर `दुकटं’ अपत्य असल्यामुळे शेअरिंगसाठी मित्रमंडळींवर अवलंबून असतात. त्यांच्या मजेत वेळ घालवण्याच्या जागा आणि संकल्पना बरेचदा मॉल वा तत्सम खर्चिक पर्यायांशी जाऊन पोहोचतात. ज्यांच्या वाटय़ाला `स्पेशल’ कुणीतरी येतं, त्यांच्यासाठी स्पेशल कुणाच्या शोधाचा प्रश्न सुटतो. पण ज्यांच्या वाटय़ाला ते येत नाही तेही `वो लडकी है कहां’ किंवा `वो लडका है कहां’ असं गाणं गुणगुणत, त्या विशेष व्यक्तीचं आगमन नियतीवर सोपवून स्वस्थ बसत नाहीत.
`खरं प्रेम एकदाच होत असतं’, `जनम-जनम का साथ’ वगैरे 1960-70च्या दशकातल्या प्रेमाच्या कल्पनेपेक्षा आजच्या पिढीच्या प्रेमाच्या नात्यातल्या अपेक्षा खूपच वेगळ्या असतात. इंग्रजी भाषेशी जवळीक असल्यामुळे ाढश, डेटिंग, रिलेशनशिप (की सिच्युएशनशिप!) अशा अनेक छटा नात्याला असू शकतात याचं भान ही पिढी बाळगून आहे. जरा कुठे काही खटकलं तर चट्दिशी हात मोकळा करून घ्यायलाही ते मागे-पुढे पाहात नाहीत. अर्थात त्यांच्यातल्याही काही जणांना हे असे `हार्ट-ब्रेक’ सहज सोसत नाहीत. नकारांची सवय नसलेल्या या पिढीतल्या काहींना `नाकारले’ जाण्यामुळे थेरपीचा आधार घेण्यापर्यंत जावं लागतं. पण हे असं असलं तरी दुसरीकडे अनोळखी तरुण-तरुणींना रोखठोकपणाने एकमेकांशी जोडणारी, त्यांच्यात ऑनलाइन किंवा ऑफलाइन `विशेष’ नात्याची शक्यता उपलब्ध करून देणारी डेटिंग अॅप्स आणि इव्हेंट्स यांचा सुळसुळाटही सध्या दिसतो आहे.
सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी बोलू नका असं आईवडिलांनी कितीही बजावलं तरी अगदी शाळकरी वयापासून मुलंमुली सोशल मीडियावर अनोळखी तरुणतरुणींशी मैत्री जोडत, संवाद साधायला सुरूवात करतात. त्यातून पुढे जाऊन काहीजण वास्तव जगात भेटण्याचं, ती मैत्री, ते नातं पुढे नेण्याचं पाऊलही उचलतात. खास ऑनलाइन-ऑफलाइन डेटिंगच्या हेतूनेच तरुणतरुणींना मंच उपलब्ध करून देणाऱया टिंडर, बम्बल यांसारख्या डेटिंग अॅप्सवर आता लाखो भारतीय मुलामुलींची प्रोफाइल आहेत. इथे फोटोसह आपले छंद आदी सांगून आकर्षक प्रोफाइल तयार करता येतं. आपण थेट लग्नाच्या हेतूने इथे आहोत की तूर्तास निव्वळ डेटिंगचाच इरादा आहे हेही स्पष्ट करता येतं. पूर्णपणे अनोळखी अशा इथल्या व्यक्तींच्या संपर्कात तरुणतरुणी बिनधास्त राहतात. दिवसभर वा दिवसाच्या विशिष्ट वेळेला त्यांच्याशी चॅट करतात. आपल्या आयुष्यातल्या घडामोडी, मनातल्या गोष्टी शेअर करतात. यातली काही डेटिंग अॅप्स तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोफाइलची पडताळणी करतात. फोटो वास्तवच आहेत याची खातरजमा करतात. परंतु `एआय’च्या जमान्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही अनेकांकडून होतोच. बरेचदा आपलं संभाषण इंटरेस्टिंग ठेवण्यासाठी चॅटजीपीटी किंवा तत्सम एआयची मदत घेतली जाते. त्यामुळे ऑनलाइन अस्खलित इंग्लिशमध्ये बोलणारा तरुण प्रत्यक्षात दोन ओळीही नीट बोलू शकत नाही असा अनुभवही एखादीच्या वाटय़ाला येतो. फोटोंमध्ये फिल्टर वापरणं वा विशिष्ट मोबाइलच्या वापरातून काढलेले देखणे फोटोच ऑनलाइन ठेवणं यातूनही प्रत्यक्ष भेटल्यावर अपेक्षाभंग होऊ शकतो.
ऑनलाइन डेटिंगमधले हे अपेक्षाभंग आणि उणिवा टाळण्यासाठी की काय, आता डेटिंग इव्हेंट्सचंही पेव फुटलं आहे. `बुक माय शो’सारख्या कार्पामविषयक अॅपवर डेटिंग वा मीटअपचे दहाबारा इव्हेंट या शनिवारी मुंबईत नोंदलेले दिसले. शंभर रूपयांपासून दीडहजार रुपयांपर्यंतचं तिकीट काढून अशा कार्पामांना उपस्थित राहता येतं. इथेही प्रोफाइलची पडताळणी होते. परंतु `उपस्थित व्यक्तींमध्ये पुढे जे काही होईल त्याची जबाबदारी आमची नाही’ हे आयोजकांनी स्पष्ट केलेलं असतं. संभाव्य धोक्यांची जाणीव बाळगून, स्वत:ला सुयोग्य वाटलेल्या व्यक्तीशी किती आणि कसं संपर्कात राहायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. कधी कधी न पटल्यास जुजबी बोलून संपर्क आटोपता घेतला जातो. पण काही वेळा प्रकरण पुढे गेलेलं असतं. अशावेळी त्या नात्यातून हात मोकळा करून घेणं जडही जातं. भारतात अनेक हत्या प्रकरणांच्या मुळाशी प्रेमसंबंध वा लिव्ह इन प्रकरणं असल्याचं अलीकडे एका पाहणीत आढळून आलं आहे. परंतु तरुण पिढी असे सारे धोके नजरअंदाज करून मोठय़ा प्रमाणात या अॅप्सकडे वा अशा मीटअप इव्हेंट्सकडेही वळते आहे.
शहरातल्या अफाट गर्दीत आणि समाज माध्यमांवरल्या कोलाहलात खूप एकाकीपणा भरून आहे. त्यामुळेच सोबतीसाठी तरुणतरुणींची पावलं इथे वळताहेत हे उघड आहे.