
>> रविप्रकाश कुलकर्णी
खंरं तर रोज कुठे ना कुठे संमेलनं, साहित्य संमेलनं, मग त्याची नावं वेगवेगळी असतील, होत असतात. त्यात उत्साहाने अनेक जण सामील होतात. पण यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं त्याची खुमारी काही औरच. हे संमेलन आपल्याकडे व्हावं यासाठी गावोगावची मंडळी साहित्य महामंडळाकडे अर्ज करतात! या आलेल्या अर्जांतून कोणती संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्व दृष्टीने पेलू शकेल याची महामंडळातील तज्ञ मंडळीकडून पाहणी करून एका संस्थेची निवड करते. त्यानंतर संमेलनाध्यक्षाची निवडणूक. त्यासाठी उभे असलेल्यांची जणू साठमारीच असायची. मात्र आता निवडणूक पद्धतीत बदल झाल्यामुळे घटक संस्था आणि महामंडळ यांच्या मतावर, मतातून अध्यक्षांची निवड होते. यादरम्यान बरीच भवती न भवतीदेखील होते. आरोप, प्रत्यारोप, उखाळ्या, पाखाळ्या, सडा, शेणसडा असं सगळं होतं. ते पाहून कोणालाही वाटावं की, ही शहाणी सुरती माणसं अशी काय वागतात? असं सगळं होऊनही शेवटी सगळं आलबेल होऊन एकदाचं संमेलन पार पडतं. त्यालाच संमेलन यशस्वी झालं असं म्हणतात. या अनुभवाला धरूनच, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अशा साहित्यिक संस्थांच्या कारभारात चांगल्याच मुरलेल्या, तिथले उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या भीमराव कुलकर्णी यांनी म्हटलं होतं, ‘महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, याबद्दल वि.का राजवाडे यांच्यापासून अनेकांनी काथ्याकूट केलेला आहे. यापुढे देखील होईल, पण मला विचाराल तर मी उत्तर देईन, साहित्य संमेलनाच्या निमित्ताने जे काही होतं ते म्हणजेच महाराष्ट्र धर्म…’
एकूण काय, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मराठी साहित्य जगतात अटळ होऊन बसलेलं आहे. हे पाहूनच आणि अनुभवून असेल, गुलजार यांनी म्हटलं की, या मराठी साहित्य संमेलनासारखी गोष्ट जगात दुसरीकडे कुठेही नाही. ही अपूर्व गोष्ट आहे. अर्थात तेदेखील खरंच…
तर असं हे संमेलन माहात्म्य. यंदाचं म्हणजे 2025 मधलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे 98वे असून ते दिल्लीत घ्यावं असं सरहद, पुणे या संस्थेने सुचवलं आणि ते मान्यही झालं. अर्थात ती जबाबदारी सरहदने उचलली म्हणूनच ते होऊ शकलं. मात्र कुठे ती फर्ग्युसनची टेकडी आणि कुठे तो हिमालय असा विचार करणाऱयांना वाटलं. लोक कसं पटकन विसरतात पहा. याच सरहद संस्थेतर्फे पंजाबमधील घुमान येथे झालेलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवलं होतं. महाराष्ट्र आणि पंजाब यामधला सेतुबंध नव्याने सुरू करून दाखवला. पंजाबी लोकांना आपला संत नामदेव आजही प्रातस्मरणीय वाटतो हे मधल्या काळात आम्ही मराठी लोक विसरून गेलो होतो. ते भावबंध सरहद संस्थेने नव्याने बांधलं. अर्थात सरहद म्हणजे संजय नहार आणि त्यांच्या सक्षम कार्यकर्त्यांची फौज अशी त्यांची थोडक्यात ओळख करून देता येईल.
म्हणजे जो माणूस घुमानलादेखील साहित्य संमेलन यशस्वी करून दाखवतो तो भारतात कुठेही मराठी संमेलन यशस्वी करून दाखवेल एवढा विश्वास संजय नहार यांनी निर्माण केलेला आहे. यापूर्वी कधीकाळी दिल्लीला साहित्य संमेलन भरलेलं होतं याची आठवणदेखील फारशी राहिलेली नाही. म्हणूनच की काय, संजय नहार यांच्या चिनार प्रकाशनातर्फे त्या संमेलनाचा इतिहास सांगणारं पुस्तक प्रकाशित केलं आहे आणि त्यातून जणू सांगितलंय की आता इतक्या वर्षांनी होणारं हे साहित्य संमेलन आम्ही यशस्वी करून दाखवू हा विश्वास त्यातून दिसतो.
आता 21/ 22 /23 फेब्रुवारी 2025 या दरम्यान दिल्ली येथील तालकटोरा मैदानात हे संमेलन भरत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अखेरीस उशिरा का होईना, मिळाला. तेव्हापासून त्याचे पडसाद आमच्या सांस्कृतिक जीवनात दिसू लागले आहेत. अशा वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्याबाबतीत मागे कसं असेल? पण विशेष म्हणजे या संमेलनाच्या उद्घाटनाला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत आणि मोदी म्हटलं की तो बातमीचा विषय होतो. त्यामुळे जे जे होईल ते पाहावे हे खरेच. पण त्याच वेळी आम्हास आम्ही पुन्हा पाहावे असे म्हणताना कुठलाही चष्मा अथवा पूर्वग्रह नसला म्हणजे झालं.
हे संमेलन यशस्वी व्हायलाच पाहिजे. त्याचे पडसाद पुढील काळात नक्की पडतील. संमेलन घडवून आणणाऱया सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया!