
>> रेश्मा गोरे–फुटाणे
हिंदू संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ गणेशस्तवनाने करण्याची पूर्वापार प्रथा आहे. महाराष्ट्रात तर ज्ञानेश्वरी आणि दासबोधसारख्या मराठी भाषेतील श्रेष्ठ ग्रंथांच्या प्रारंभीसुद्धा अत्यंत रसाळ भाषेत गणेशवंदना केलेली आढळते. प्रथितयश विवेचक ब्रह्मलीन सद्गुरू श्री वासुदेव वामन बापट गुरुजी यांनी विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने श्री गणेशाच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही रूपांना आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीने (जसे गणेशाला दुर्वा प्रिय का?) जाणून घेणे सर्वांना शक्य व्हावे या सर्वोच्च हेतूने सन 2003 ते सन 2015 या कालावधीमध्ये ‘श्री गणेश’ या विषयावर विविध विवचने केली. सद्गुरूंच्या या विवेचनाच्या संकलनावर आधारित ‘श्री गणेश दैवतः अध्यात्म आणि विज्ञान’ हे पुस्तक आहे.
‘ओम नमोजी आद्या’ या प्रथम प्रकरणात आदिदेव आणि विघ्नांचा नाश करणारा गणपती कसा आहे हे समजावून सांगताना निघंटुकोशातील वैज्ञानिक संदर्भ दिला आहे.
गुरुजींनी आपल्या रसाळ आणि ओघवत्या शैलीत श्री गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महाकवी कालिदासाचे गणेशाला केलेले काव्यात्मक आवाहन, आचार्य शंकराचार्यांनी भक्तिरसात डुंबणाऱया गणेशाचे वर्णन म्हणजे ‘श्री गणेश पंचरत्न स्तोत्र’. आपण गणपतीकडे भौतिक सुखाच्या हव्यासापासून आणि दुःखाच्या तिरस्कारापासून अलिप्त राहून नेमके काय मागावे हे सांगणारे श्री टेंबे स्वामी विरचित ‘समंत्रक श्री गणपती स्तोत्र’ तसेच सर्वश्रेष्ठ अशा श्री गणेश मानसपूजेचे विवरण केले आहे.
श्री गणेश दैवतः अध्यात्म आणि विज्ञान
विवेचक ः सद्गुरू श्री वासुदेव वामन बापट गुरुजी
प्रकाशक ः यज्ञेश्वर प्रकाशन
पृष्ठे ः 161 मूल्य ः 200 रुपये.