
>> स्वप्नील साळसकर
कोविडच्या काळात दोन वर्षे मुले मोबाइलच्या जास्त आहारी गेल्याचे जाणवले आणि त्यामुळेच प्रमोद कोयंडे यांच्या ‘रस्सा उडाला भुर्रर्र’ या गमतीदार बालकथासंग्रहाची निर्मिती झाली. आपल्या लहान मुलीला रोज रात्री झोपताना सांगितलेल्या नवीन गोष्टी पुस्तकरूपात उतरल्या. कोयंडे यांची ओघवती भाषा आणि त्यात मालवणी संवाद यामुळे मुले भेळ खाता खाता या कथा सहज वाचून पूर्ण करतील, शिवाय मोठय़ांनाही आनंद देतील अशाच आहेत.
हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या देवगडमधील खाडीकिनारी वसलेल्या एका छोटय़ाशा गावातील कथा कोयंडे यांनी लिहिली आहे. झाडाझुडपांच्या एका झोपडीत राहणाऱया कोल्हा, कोल्हीण आणि दोन पिल्लांची ही कथा अमावस्यादरम्यान ‘कुर्ले होये’ म्हणून हट्ट करणाऱया पत्नीच्या मागणीवरून पुढे रंजक ठरते.
घरात शिजवलेला कुर्ल्यांच्या (खेकडे) दरवळाने जंगलात घमघमाट सुटतो आणि मग एकेक प्राणी कोह्याच्या झोपडीबाहेर येऊन धमकी देत आपला हिस्सा मागून घेतात. सर्वांना हा रस्सा वाटप करता करता कोह्याच्या पदरात मात्र काहीच राहात नाही. त्यात जंगलचा राजा वाघोबा माकडाकडे निरोप पाठवून रश्श्याची मागणी करतो. हे जेव्हा सर्व प्राण्यांना कळते त्या वेळी मात्र सर्वजण कोह्याच्या बाजूने उभे राहतात. या हुकूमशहाचा बंदोबस्त करण्यासाठी मग सगळेच दंड थोपटतात आणि या वाघाला कायमची अद्दल घडवतात.
चिंगी, चार्ली आणि नागोबा ही कथाही तेवढीच महत्त्वपूर्ण असून आपल्या वाढदिवसाला चिंगीने बाबांशी हट्ट करून आणलेली चार्ली मांजर कुटुंबातील एक आवडती सदस्य बनते हे मांडणारी ही कथा. आहे.
तिसऱया कथेत भुताच्या घरात बंटी कसा अडकतो हा मजेशीर किस्सा बालकांना गुंतून ठेवतो. उन्हाळ्याच्या सुट्टीत शहरातून आपल्या कोकणातील गावात धम्माल करायची असे म्हणून बंटी ट्रेनमधून गावी प्रवासाला निघालेला असतो. मुलखात जायचे म्हणजे रात्रभर झोप नाही. गाडी गावाच्या दिशेने निघाल्यावर मंद वाऱयावरच बंटी पेंगू लागतो आणि हळूहळू झोपी जात स्वप्नांच्या आधीन होतो. सायंकाळच्या वेळेत सर्वजण ‘काजी’ (काजू) गोळा करण्यासाठी जातात. अशा वेळी डोंगराजवळ पोहोचलेली मुले बंटीला सांगतात, त्या डोंगरावर ‘भुताचा घर आसा.’ मात्र तो या सर्व गोष्टी झुगारत त्या झाडीझुडपांच्या दिशेने चालत राहतो. सायंकाळचा काळोख पडलेला असतो. कोह्याची ओरड, घुबडांचा आवाज यामुळे बंटी घाबरतो. घरी यायला वाट सापडत नसते. त्याच वेळी त्याच्या गळ्याभोवती वेलीचा फास पडतो आणि तो आई असे जोरात ओरडतो. आई-बाबा पटकन त्याच्या जवळ येत म्हणतात. बाळा दिवसापण स्वप्नं कसली बघतोस, ऊठ, वैभववाडी स्टेशन गेलं. आपल्याला कणकवलीत उतरायचे आहे. त्याच वेळी बंटीलाही दरदरून घाम फुटलेला असतो. अशा मजेशीर गोष्टी वाचताना लहानग्यांनाच नाही तर पालकांनाही शेवटपर्यंत उत्सुकता निर्माण करतील यात शंका नाही.
रस्सा उडाला भुर्रर्र
लेखक ः प्रमोद यशवंत कोयंडे
प्रकाशक ः यशप्रभा प्रकाशन मूल्य ः 150 रुपये