![Immigrants](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Immigrants-696x447.jpg)
अमेरिका आणखी 119 अवैध हिंदुस्थानी नागरिकांना हद्दपार करणार असून उद्या, शनिवारी हे विमान अमृतसर विमानतळावर दाखल होणार आहे. दुसऱया बॅचमध्ये मायदेशात परतणाऱया 119 नागरिकांपैकी सर्वाधिक 67 जण पंजाबमधील आहेत, तर हरयाणातील 33, गुजरातमधील 8, उत्तर प्रदेशातील 3, महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानमधील प्रत्येकी 2 तसेच हिमाचल प्रदेश व जम्मू-कश्मीरमधील प्रत्येकी 1-1 नागरिक आहे. यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी अमेरिकन लष्कराचे सी-17 हे विमान 104 अवैध हिंदुस्थानींना घेऊन आले होते.
तसेच रविवारी, 16 फेब्रुवारी रोजी बेकायदा हिंदुस्थानींना घेऊन येणारे आणखी एक अमेरिकन विमान येणार असल्याचे वृत्त आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरितांविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. पंजाब आणि इतर काही राज्यांमधील अनेक लोक ‘डंकी मार्ग’ वापरून अमेरिकेत प्रवेश करतात. या बेकायदेशीर मार्गाने अमेरिकेत प्रवेश केलेल्या स्थलांतरितांना आता ट्रम्प प्रशासन बाहेरचा रस्ता दाखवत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकेचा दौरा केला. या वेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अवैध स्थलांतराच्या मुद्दय़ावर चर्चा केली. मोदी म्हणाले की, हा केवळ हिंदुस्थानचा प्रश्न नाही. बेकायदेशीररित्या जे लोक दुसऱया देशांमध्ये वास्तव्य करतात, त्यांना अशा पद्धतीने कोणताही कायदेशीर अधिकार नाही.
पंजाबला बदनाम करण्याचा डाव – भगवंत मान
केंद्र सरकार पंजाबला बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. ते कधी पंजाबचा निधी थांबवतात आणि आता अमेरिकेतून हद्दपार होत असलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना आणणारी विमाने अमृतसरमध्ये उतरवत आहेत. अमेरिकेतून येणारे विमान अंबाला येथे का उतरवले जात नाही. केवळ पंजाब आणि पंजाबी लोकांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. अशी टीका पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली.