![Mhada](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Mhada-696x447.jpg)
सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडा मुख्यालयात एका महिलेने अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये पैसे उधळल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. या घटनेनंतर सदर महिलेला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. मात्र हा गौडबंगाल आहे तरी काय? अशी चर्चा म्हाडात रंगली होती.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. दिवसाला विविध कामांनिमित्त म्हाडा मुख्यालयात 4 ते 5 हजार लोक भेट देतात. शुक्रवारी दुपारी आंदोलक महिला दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर आली. तिथे महिलेने अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे केबिनमध्ये उधळले. त्यानंतर पैशांचा हार केबिनच्या दरवाजाला घातला. या वेळी संबंधित अधिकारी पाहणी दौऱ्यावर गेल्यामुळे केबिनमध्ये उपस्थित नव्हता. दरम्यान, या प्रकारानंतर म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलक महिलेला ताब्यात घेतले. आपल्याला हात लावाल तर आपण दुसऱ्या मजल्यावरून उडी मारू, अशी धमकी महिलेने दिली. त्यानंतर महिला सुरक्षा रक्षकांनी आंदोलक महिलेला मुख्यालयाबाहेर हुसकावून लावले.