हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाहीत, आम्ही पीक विमा देतोय! ‘माणिक’ कोकाटेंचे वादग्रस्त ‘कोकाटणे’

हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱयांना एक रुपयात पीक विमा देतोय, असे वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. पीक विमा योजनेतील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने बोलताना या अवमानास्पद टिपणीमुळे राज्यभरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अन्नदात्या शेतकऱयांचा अवमान करणाऱ्या कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे.

महायुती सरकारच्या काळात पीक विमा योजनेत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. कृषीमंत्री कोकाटे यांनीही या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे काही दिवसांपूर्वीच मान्य केले आहे. अमरावती दौऱ्यावर असलेल्या कोकाटे यांनी याच अनुषंगाने आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱयांना एक रुपयात पीक विमा दिला; मात्र काही लोकांनी त्याचा गैरवापर केला आहे.

सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली. मात्र, काही लोकांनी त्याचा गैरउपयोग केला. अन्य राज्यांतील लोकांनीसुद्धा पीक विम्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल केले. प्रत्यक्षात चौकशी केल्यावर कळाले की, 4 लाख अर्ज नामंजूर केले आहेत. पीक विमा कंपन्या शेतकऱयांची लुटमार करतात. या योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे कृषीमंत्री कोकाटे म्हणाले.

शेतकऱयांची तत्काळ माफी मागा – जितेंद्र आव्हाड

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सत्तेचा माज चढलाय, हे त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. देशाच्या पोशिंद्याला भिकाऱयाची उपमा देणाऱया कोकाटे यांनी तमाम शेतकरी बांधवांची तत्काळ माफी मागावी,’ अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

कोकाटेंचा मंत्रीपदाचा राजीनाम घ्या – अतुल लोंढे

शेतकऱयांना भिकारी म्हणून त्यांचा अपमान करणाऱया कोकाटे यांना मंत्रीपदावर बसण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी त्यांचा राजीनामा घेऊन घरी पाठवावे. शेतकरी अन्नदाता आहे. देशाचा मालक आहे. तो घाम गाळून पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येते. त्या शेतकऱयांना भिकारी म्हणण्याची हिंमत कशी होते, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

एक रुपयात विमा देऊन उपकार करत नाही – अंबादास दानवे

ज्या शेतकऱयांना आपण अन्नदाता म्हणतो, त्याला या सरकारमधील कृषीमंत्रीच भिकाऱ्यांची उपमा देत आहेत. 1 रुपयात विमा देऊन सरकार शेतकऱयांवर उपकार करत नाही. याच शेतकऱयांच्या बळावर राज्य चालते हे लक्षात ठेवा, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले.