पदकांचे द्विशतक झाले, पण अव्वल स्थान गेले!

महाराष्ट्राने सलग दुसऱयांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोनशे पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मात्र गतवर्षी गोव्यातील राष्ट्रीय स्पर्धेत सेनादलाची मत्तेदारी मोडीत काढून तब्बल 29 वर्षांनंतर महाराष्ट्राने 228 पदके जिंकून पदक तक्त्यात ‘नंबर वन’चे सिंहासन काबीज केले होते. यंदाच्या उत्तराखंडमधील 38 व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने 54 सुवर्णांसह, 71 रौप्य व 76 कांस्य अशी एकूण सर्वाधिक 201 पदकांची लयलूट केली. मात्र सेनादलाने सर्वाधिक 68 सुवर्ण पदके जिंकून पुन्हा एकदा अव्वल स्थान काबीज करत महाराष्ट्राला दुसऱ्या स्थानावर ढकलले. मात्र यंदा स्पर्धेतही पदकांचे द्विशतक ठोकणारा महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरला, हे विशेष. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी मल्लखांबपटूंच्या यशाने महाराष्ट्राने पदक संख्या दोनशेपार करून देवभूमीतील स्पर्धा गाजविली.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 17 व्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मल्लखांब स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला नव्हता. स्पर्धा समितीने शुक्रवारी सकाळी पदकाचा अंतिम तक्ता जाहीर केला. यामध्ये मल्लखांबमधील 3 कांस्य पदकांमुळे महाराष्ट्राने पदकाचे द्विशतक पूर्ण केले. शार्दुल हृषिकेश, रिषभ घुबडे व दर्शन मिनियार यांनी महाराष्ट्रासाठी शेवटची पदके जिंकली. त्यापूर्वी अखेरचे सुवर्ण पदकही रूपाली गंगावणे हिने पटकावले. मल्लखांबात शार्दुल हृषिकेशने पदकांचा चौकार झळकविला. आदित्य पाटील, सोहेल शेख, मृगांक पाठारे यांनीही पदकांची कमाई केली आहे. 4 सुवर्ण, 4 रौप्य व 5 कांस्य पदकांची लयलूट करत महाराष्ट्राने मल्लखांबात विजेतेपदही पटकाविले.

महाराष्ट्राला 27 खेळांत पदके

उत्तराखंडच्या राष्ट्रीय स्पर्धेत जय महाराष्ट्राचा डंका वाजविणाऱ्या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तब्बल 27 क्रीडा प्रकारात पदके जिंकण्याचा पराक्रम केला. यात जिम्नॅस्टिक खेळात महाराष्ट्राने सर्वाधिक 12 सुवर्णांसह 24 पदके जिंकली आहेत. याचबरोबर मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये 7 सुवर्ण, 3 रौप्य व 3 कांस्य अशी एकूण 13 पदके जिंकली. जलतरणात या वेळी महाराष्ट्राने 6 सुवर्ण, 14 रौप्य व 15 कांस्य अशी एकूण 35 पदके जिंकली. महाराष्ट्राने सलग दुसऱया स्पर्धेत दोनशेपार पदके जिंकल्यामुळे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.