![post](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/post-696x447.jpg)
टपाल विभागात लवकरच पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), सहाय्यक अधीक्षक अशी सुमारे 21 हजार 413 पदांची मेगाभरती होणार आहे. उमेदवार 3 ते 28 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. टपाल विभागाचे अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in वर अर्ज भरता येणार आहे. या मेगाभरतीमुळे रोजगाराची एक चांगली संधी तरुणांना मिळणार आहे.
देशात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत असताना टपाल विभागाने काढलेल्या 21 हजारांच्या रिक्त पदांच्या भरतीमुळे या तरुणांना मोठी संधी प्राप्त होणार आहे. भरतीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य असले पाहिजेत. याशिवाय, उमेदवारांना संगणक हाताळण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे. मेगाभरतीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात दीड हजार जागा
ही भरती संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 3004, ओडिशा 1101, तामिळनाडू 2292, कर्नाटक 1135, आसाम 1870, गुजरात 1203, आंध्र प्रदेश 1215, पश्चिम बंगाल 923, बिहार 783, छत्तीसगड 638, झारखंड 822, पंजाब 400, हिमाचल प्रदेश 331 तर महाराष्ट्रात 1498 जागा भरणार आहेत.
लेखी परीक्षा होणार नाही
भरतीतील निवड प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित असेल. परीक्षार्थींची कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. या भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवाराचे किमान 18 वर्षे पूर्ण तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षांपर्यंत असावे. भरती नियमानुसार आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. एससी/एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट, ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांची सूट तर दिव्यांग उमेदवारांसाठी 10 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज शुल्क आहे तर एससी/एसटी/महिला/दिव्यांगांना शुल्क नाही.