केरळच्या मंदिरात पारंपरिक लग्न सोहळा; विदेशी प्रेमीयुगुलाचा देशी विवाह

अनेक विदेशी जोडपी हिंदुस्थानी संस्कृतीने प्रभावित होऊन हिंदू पद्धतीने लग्न करतात. असाच एक आगळावेगळा लग्न सोहळा नुकताच केरळमध्ये पार पडला. तिरुवनंतपुरमच्या पिरविलाकम मंदिरात विदेशी प्रेमीयुगुलाने पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाह केला. या जोडप्यांनी आपल्या लग्नाला स्थानिक लोकांना निमंत्रण देऊन वेगळा पायंडा पाडला. नुकतेच डॉमनिक पॅमिलो वोलिनी (40) आणि पॅमिला लुईस बेल मदानी (30) यांनी हिंदू रिवाजाने लग्न केले. दोघे अमेरिका आणि डेन्मार्कचे राहणारे आहेत. दोघे हिंदू संस्कृतीच्या प्रेमात आहेत. दोघांनी शुभ मुहूर्तावर एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली. या लग्नाचे वैशिष्टय़ म्हणजे वधूवरांना आशीर्वाद द्यायला स्थानिक लोक मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.

केरळच्या संस्कृतीचा अभ्यास

डोमेनिक आणि पॅमिला मागील अडीच वर्षांपासून कोवलम येथे केरळच्या पारंपरिक मार्शल आर्टचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे केरळची संस्कृती जवळून बघता आली. त्यांनी हिंदुस्थानच्या परंपरा, रीतिरिवाज जाणून घ्यायचा प्रयत्न केला. त्यामुळेच त्यांनी हिंदू पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला