![Ratnagiri News](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Ratnagiri-News-2-696x447.jpg)
समुद्र किनारी गस्त घालणाऱ्या ड्रोनकडून दहा वावच्या बाहेर समुद्रात मासेमारी करणाऱ्या मासेमारी नौकांची छायाचित्र घेतली जात आहेत. किनाऱ्यावरून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या नौकांचे चित्र घेवून दहा वावाच्या आत मासेमारीचा दोष ठेवून दंडात्मक कारवाई होत आहे. यासंदर्भात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची विनंती मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांच्याकडे केली. मच्छिमारांच्या या संदर्भातील मागण्यांचे निवेदन आल्यानंतर ते वरिष्ठ पातळीवर पाठवून देवू असे आश्वासन सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी मच्छिमारांना दिले.
अवैध मासेमारी रोखण्यासाठी 10 जानेवारीपासून समुद्र किर्नाघ्यावर ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. यासंदर्भातील अडचणी सांगण्यासाठी मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्तांची गुरूवारी भेट घेतली. मच्छिमार नेते इम्रान मुकादम, दिलावर गोदड, काँग्रेस नेते दिपक राऊत यांच्या नेतृत्वाखाली मच्छिमारांनी ड्रोन कारवांई संदर्भात आपल्या व्यथा मांडल्या.
रत्नागिरी समुद्र किनारा वगळता इतर समुद्र किनारी पाच वाव अंतराचा नियम आहे. रत्नागिरीत दहा वाव पुढील अंतराच्या समुद्रात मासेमारी करण्याचा नियम आहे. हा येथील मच्छिमारांवर अन्याय आहे. कर्नाटकातील मलपी बंदरावर अद्यावत नौका येथील मासळी खरवडून नेत आहेत. त्यांच्यावर धडक कारवाई होण्याची गरज आहे. यावर गेल्या दोन वर्षात मलपीच्या दोन अद्यावत नौकांवर कारवाई करण्यात आली असल्याचा खुलासा सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कुवेसकर आणि परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी केला.
समुद्रात वारा असेल तर दहा वावच्या बाहेर मासेमारी करणे फिशिंग नौकाना धोक्याचे असते. अशावेळी रत्नागिरी समुद्रात मासेमारी करण्याचे अंतर 5 वावच्या पुढे असावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासंदर्भात निवेदन देण्यात यावे. ते निवेदन आयुक्त कार्यालयाला पाठवले जाईल, असे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी आश्वासन दिले.