पतीला 14 तासांचे काम, पत्नीला हवाय घटस्फोट

सोशल मीडियावर अनेकदा लोक आपली कथा-व्यथा सांगत असतात. ई-कॉमर्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने अशाच पद्धतीने आपली कहाणी शेअर केली. दिवसाला 14-14 तास काम करून त्याला प्रमोशन मिळाले. त्याचा पगार सात लाखांच्या पार गेला. मात्र तरीही त्याची पत्नी त्याला सोडून जातेय, म्हणजे घटस्फोट मागतेय. कर्मचाऱ्याची ही व्यथा सोशल मीडियावर ट्रेंड करतेय. यानिमित्ताने वर्क लाईफ बॅलन्सची चर्चा रंगली आहे. कर्मचाऱ्याने ओळख उघड न करता आपली व्यथा सांगितली.

तो दिवसाला 14 तास काम करतो. तीन वर्षे प्रचंड मेहनत केल्यानंतर त्याला प्रमोशन मिळाले. सकाळी 7 वाजल्यापासून त्याच्या ऑफिस मीटिंग सुरू व्हायच्या. त्या रात्री 9 वाजेपर्यंत चालायच्या. करीअरच्या नादात त्याने कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. कुटुंबातील महत्त्वाच्या प्रसंगालाही तो घरी नसायचा. मुलीच्या जन्माच्या वेळीदेखील तो पत्नीसोबत नव्हता. त्या वेळी पत्नीची काळजी घेऊ शकला नाही. आता त्याचे प्रमोशन झालेय. पगारही खूप वाढलाय, पण तो खुश नाही. कारण त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी होऊ इच्छित आहे. अज्ञात कर्मचाऱ्याने व्यथा सोशल मीडियावर सांगितल्यानंतर पुन्हा एकदा वर्क लाईफ बॅलन्सची चर्चा रंगली आहे.

आजच्या काळात तरुणांना नोकऱ्या मिळणे कठीण जातंय. नोकरी मिळाली तर त्यात अनिश्चितता असते. कामात बढती हवे असेल तर वैयक्तिक आनंदाचा त्याग करावा लागतो. काम हेच आयुष्याचं सूत्र बनून जातं. त्यामुळे कुठेतरी ऑफिस वर्क आणि पर्सनल लाईन यांच्या संतुलनाची गरज व्यक्त होत आहे.