![jp morgan](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/jp-morgan-696x447.jpg)
अमेरिकेतील सर्वात मोठी बँक जेपी मॉर्गन चेसने गेल्या तिमाहित रेकॉर्डब्रेक नफा मिळवल्यानंतरसुद्धा 1 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. या नोकर कपातीनंतरसुद्धा जेपी मॉर्गन आणखी कर्मचारी कपात करण्याची तयारी करत आहे. जेपी मॉर्गनने चौथ्या तिमाहीत मजबूत डीलमेकिंग आणि ट्रेडिंगमधून जबरदस्त नफा कमावला, परंतु तरीही कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. कर्मचारी कपातीनंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेमी डिमन यांनी यासंबंधीची माहिती दिली.
जिओ स्टारचे नवे प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टार लाँच
जिओ स्टारने एक नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टार लाँच केले. हे प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा, डिज्नी प्ल्स हॉटस्टार यांच्या विलीनीकरणानंतर बनवण्यात आले आहे. यामुळे जिओ युजर्सना जिओ सिनेमा आणि डिज्नी प्लस हॉटस्टार दोन्ही प्लॅटफॉर्मचा कंटेट एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जिओ हॉटस्टारवर सध्याच्या कंटेट अॅक्सेससाठी तीन महिने आणि एक वर्षाचे सब्सक्रिप्शन प्लॅन आणले आहेत. जिओ हॉटस्टार एआय पॉवर्ड इनसाइट्स, मल्टी अँगल ह्यूईंग आणि स्पेशल इंटरेस्ट फीड पाहणे यासारखी सुविधा मिळेल.
सौदी अरबचे हज यात्रेसाठी नवे नियम जारी
सौदी अरबने हज यात्रा 2025 साठी नवीन नियम जारी केले आहेत. या नव्या नियमांतर्गत आता हज यात्रेत लहान मुलांना सहभागी होता येणार नाही. हजच्या वेळी होणारी प्रचंड गर्दी तसेच सुरक्षेच्या कारणांमुळे लहान मुलांना हज यात्रेत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. यासोबतच व्हिसा धोरणांमध्येही बदल करण्यात आला असून हिंदुस्थान, पाकिस्तान, इंडोनेशिया, इजिप्त आणि इतर 10 देशांतील नागरिकांना फक्त सिंगल-एंट्री व्हिसा दिला जाणार आहे. देशांतर्गत यात्रेकरूंसाठी हज पॅकेजेसची रक्कम तीन हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. या नव्या नियमाची माहिती सौदीने सोशल मीडियावरून दिले आहे.
जगभरातील तुरुंगांत 10,152 हिंदुस्थानी कैदी
जगभरातील तुरुंगांत 10152 हिंदुस्थानी नागरिक कैदी आहेत. सर्वात जास्त म्हणजे 2633 हिंदुस्थानी कैदी सौदी अरबच्या तुरुंगात आहेत, तर अमेरिकेच्या तुरुंगात 169 आहेत. पेंद्र सरकारने जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील तुरुंगांत किती हिंदुस्थानी आहेत, याची आकडेवारी नुकतीच दिली. त्यानुसार नेपाळच्या तुरुंगात 1317 हिंदुस्थानी कैदी आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तुरुंगात अनुक्रमे 266 आणि 97 हिंदुस्थानी कैदी आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. तृणमूल काँग्रेसच्या साकेत गोखले यांनी प्रश्न विचारला होता. जगभरातील वेगवेगळ्या देशांत किती नागरिक बंदिवान आहेत, याची माहिती साकेत गोखले यांनी विचारली होती. त्याला उत्तर देताना सरकारने विदेशातील तुरुंगांत 10152 हिंदुस्थानी कैदी असल्याचे सांगितले.
प्री–डायबेटिसवरून मद्रास रिसर्चचा नवा दावा
रोजच्या आहारात भाजलेले आणि मीठ नसलेले पिस्ते जेवण करण्याआधी खाल्ल्यास प्रीडायबेटिस व्यक्तींमध्ये टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो, असा दावा मधुमेह संशोधनासाठीच्या मद्रास डायबेटिस रिसर्च फाऊंडेशन (एमडीआरएफ) च्या नव्या अभ्यासातून करण्यात आला आहे. हा अभ्यास एशियन इंडियन प्रीडायबेटिक प्रौढांमध्ये प्रीमील पिस्ता पूरक आहाराचा कार्डियो मेटाबोलिक जोखमीवर परिणाम ः एक नियंत्रित चाचणी या नावाने द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झाला आहे. 12 आठवडय़ांच्या या चाचणीमध्ये 120 प्रीडायबेटिक व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. दररोज न्याहारी व रात्रीच्या जेवणाच्या आधी 30 ग्रॅम पिस्ते सेवन केल्याने ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन पातळी व जेवणानंतरच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले, असा दावा करण्यात आला.