निलंगा येथे ट्रक अपघातात दोघांचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी

निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर शुक्रवारी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ट्रकचा भाषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. लातूर जहिराबाद हायवेवर निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर बस्वकल्याण वरून लातुरच्या दिशेने सौर उर्जेचे लोखंडी ॲंगल घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडवरून खाली घसरला.

ट्रकमधील लोखंडी ॲंगल ट्रकच्या कॅबीनवर आले. त्यामुळे केबीनचा चुराडा झाला व केबीनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मसलगा येथील ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ॲंगल बाजूला करुन अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता तर एकजण गंभीर जखमी आहे. अपघात बघण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी, पोलीस जमादार सुनील पाटील व इतर घटनास्थळी येऊन पाहणी केली व घटनेची नागरिकांकडून माहिती घेतली.