पुलवामा घटनेचा नांदेडच्या भाजपच्या संघटन बैठकीत विसर; ना बॅनर ना श्रद्धांजली…

>> विजय जोशी

जम्मू कश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी जवानांवर दहशतवादी हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत 40 जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील मुदखेड येथे प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचा यात समावेश होता. या घटनेबद्दल शहीद जवानांबद्दल केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात आपुलकी व प्रेम दाखवल्याचा दिखावा करून केंद्रात दुसऱ्यांदा सत्ता मिळवली. या घटनेस यावर्षी 6 वर्षे पूर्ण झाले. भाजपच्या संघटन बैठकीत पुलवामा घटनेबद्दल साधा उल्लेखही भाजपच्या नेत्यांनी केला नसल्याने पुलवामा घटनेचा त्यांना विसर पडल्याचे दिसून येत आहे.

नांदेड येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील भक्ती लॉन्स येथे संघटन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. आज या दुर्दैवी घटनेला 6 वर्ष पूर्ण झाले. या घटनेबद्दल आपुलकी व प्रेम दाखवणाऱ्या भाजपने पुलवामा घटनेच्या शहिदांना श्रद्धांजली पर बॅनर शहरात कुठेही लावल्याचे दिसून आले नाही. तसेच संघटन बैठक कार्यक्रमातही पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली ही वाहण्यात आली नाही. यावरून शहीद जवानांबद्दल भाजपचे बेगडी प्रेम या निमित्ताने दिसून आले.

पत्रकारांनी याबाबत भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांबद्दल संघटन बैठकीत श्रद्धांजली किंवा शहीद जवानांच्या बद्दल कोणताही उल्लेख झाला नसल्याचे प्रश्न विचारला. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटन बैठक कार्यक्रमात पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांबद्दल उल्लेख करायला पाहिजे होता पण करण्यात आला नाही, असे मान्य करत सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच भाजपला सत्तेसाठी पुलवामा घटनेचा शहिदाबद्दल पुळका दाखवायचा व ज्या दिवशी ही घटना घडली होती. त्या दिवासाचे स्मरणही ठेवायचे नाही, असे ददिसून आले. भाजपच्या संघटन बैठकीतच पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांबद्दल साधा उल्लेख ही भाजपला करावासा वाटला नाही ही बाब दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त होत आहे.