ठसा – पं. प्रभाकर कारेकर

>> श्रीप्रसाद . मालाडकर 

प्रभाकर  जनार्दन कारेकर यांचा जन्म तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात दैवज्ञ परिवारात झाला होता. प्रभाकर कारेकर हे  बाराव्या वर्षी गोव्याहून मुंबईत शास्त्रीय संगीत शिकायला आले. भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांना महाराष्ट्र गंधर्व पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित  चिंतामणी रघुनाथः सी. आर. व्यास यांनी दिले. ते आकाशवाणी मुंबई केंद्र, मुंबई दूरदर्शन केंद्राचे ‘अ’ श्रेणीचे मान्यताप्राप्त कलाकार होते. त्यांनी मराठी संगीत नाटकांतली अनेक पदे गायली आहेत.

शास्त्रीय संगीत सेवार्थ मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. गोमंतकात शांतादुर्गा मंदिराच्या परिसरात होणाऱ्या सम्राट संगीत महोत्सव प्रभाकर कारेकर स्वतः आयोजित करत होते. गोव्यात नित्य शास्त्रीय संगीताची अभिरुची वृद्धिंगत होण्यासाठी ते नेहमी कार्यरत होते. प्रभाकर कारेकर स्वर प्रभा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष होते. अनेक सकुशल, आशादायक तरुण संगीतकारांना प्रशिक्षण दिलेले आहे. त्यांच्याकडे अनेक ध्वनिमुद्रण संग्रह होता. अनेक देशांमध्ये व्याख्याने, संगीत कार्यशाळा, सादरीकरण केले आहेत. ऑर्नेट कोलमन (यूएसए), सुलतान खान (भारत) यांच्यासह फ्यूजन संगीताच्या जगात ते कार्यरत होते. 1998 मध्ये उत्तर गोव्यात म्हापशात अंजनीताई मालपेकर आविष्कार संगीत महोत्सव त्यांनीच सुरू केला.

नभ मेघांनी आक्रमिले, चंदनासी परिमल, प्रिये पहा, विलोपले मधु मीलनात या, बोलावा विठ्ठल, शतजन्म शोधिताना, करिता विचार सापडले वर्म, हा नाद सोड सोड या त्यांच्या ध्वनिमुद्रिका अविस्मरणीय आहेत. ‘स्वर प्रभाकर’ हे पं. प्रभाकर कारेकर यांचे चरित्र प्रसिद्ध आहे. पंडित प्रभाकर कारेकर यांना 2014 मध्ये तानसेन सन्मान, 2016 मध्ये संगीत नाटक अकादमी, गोमंतक विभूषण (2021), अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. शास्त्रीय संगीत श्वास-उच्छ्वास असणाऱ्या पंडित प्रभाकर कारेकर यांचे कार्यकर्तृत्व रसिकांना कालातीत प्रेरणादायी आहे.