धनंजय मुंडेंना त्यांच्या निवासस्थानी भेटलो, सुरेश धस यांची प्रतिक्रिया

बीडमध्ये वाढलेल्या गुन्हेगारीची अनेक प्रकरण बाहेर काढल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस हे चांगलेच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी अनेकवेळा आपल्या पत्रकार परिषदेत बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीसाठी मंत्री धनंजय मुंडे जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. यातच आज त्यांनी मुंडे यांची भेट घेतली, अशी माहिती स्वतः सुरेश धस यांनी दिली. मुंडे आणि धस यांच्या भेटीची माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलं आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार, धस म्हणाले आहेत की, ”मी संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील गुन्हेगारांना फाशी मिळेपर्यंत शांत बसणार नाही.”

धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या भेटीबद्दल बोलताना सुरेश धस म्हणाले की, धनंजय मुंडे याचं ऑपरेशन झालं असून त्या दिवशी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी लपून छपून नव्हे तर दिवसा मी त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो. प्रकृतीच विचारपूस आणि लढा या दोन वेगळ्या बाबी आहेत, असं ते म्हणाले आहेत.