कंपनीसाठी 15 तास काम केले,पदोन्नतीसह 7 कोटींचा पगारही मिळाला पण पत्नी सोडून गेली; वाचा सविस्तर…

सध्या देशासह जगभरात कामाचे तास, कामाचा दर्जा आणि वैयक्तीक आयुष्य याबाबत चर्चा होत आहेत. काहीजण चार दिवसांच्या आठवडा करण्याच्या बाजूने बोलत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वैयक्तीक आयुष्यासाठी आणि छंद जोपासण्यासाठी वेळ मिळतो. त्यातून कामचा दर्जा सुधारतो, असे त्यांचे मत आहे. तर काहीजण आठवड्यातून 90 तास काम करण्याच्या बाजूने आहेत. या वादात आता एका पोस्टची भर पडली आहे. कंपनीसाठी 14 ते 16 तास काम केले. त्यानंतर मनासारखे पद, पदोन्नती आणि सुमारे 7 कोटींचे पॅकेज मिळाले पण वैयक्तीक आयुष्य उद्ध्वस्त झाले, असे त्या पोस्टमध्ये नमूद करत एका व्यक्तीने आपली आपबीती सांगितली आहे.

जगातील सर्वात मोठ्या टेक आणि ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीतील एका कर्मचाऱ्याने आपबीती सांगितली आहे की, त्याने पदोन्नतीसाठी काम करताना वर्षानुवर्षे त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले. अखेर मोठ्या मेहनतीने आणि चिकाटीने त्याने करिअरमधील त्याचे ध्येय साध्य केले. मात्र, त्याच्या मोबदल्यात त्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. घरासाठी आणि वैयक्तीक आयुष्यासाठी त्याला वेळ देता आला नाही, त्यामुळे बायकोने त्याच्याकडे घटस्फोट मागितला आहे.

ब्लाइंड या अनामिक व्यावसायिक समुदायावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये कर्मचाऱ्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्य गमावले. त्यामुळे आता मिळालेली पदोन्नती आणि मोठ्या पॅकेजमुळे आनंदही मिळत नसल्याचे त्याने म्हटले आहे. कामाचा ताण वाढल्याने त्याने आयुष्यातील अनेक महत्त्वाचे क्षण गमावले. पदोन्नती आणि अपेक्षित पॅकेज मिळण्यासाठी तीन वर्षे त्याने कठोर परिश्रम केले. त्याची कामची वेळ सकाळी 7 वाजता सुरू होत असे त्यावेळेपासून रात्री 9 वाजेपर्यंत त्याचे काम सुरू होते. सुमारे दिवसातील 15 ते 16 तास तो काम करत होता.

याकाळत त्याने त्याच्या मुलीचा जन्माचे आनंदाचे क्षण गमावले कारण तो त्याच्या कामात व्यस्त होता. त्याला मुलाला भेटताही आले नाही. तसेच मुलीच्या जन्मानंतर त्याच्या पत्नीला डिप्रेशनचा त्रास सुरू झाला. त्या काळातही कामाच्या व्यापात त्याला पत्नीकडे लक्ष देता आले नाही. ती एकटीच थेरपिस्टकडे जात तिचे उपचार घेत होती. या काळात मी तिच्या पाठी उभे राहायला हवे होते, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

अखेर त्याला तीन वर्षे केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले. त्याला हव्या असलेल्या पदावर बढती मिळाली आहे. पदोन्नतीसह त्याचे एकूण वेतन $900,000 ( सुमारे ₹7.8 कोटी) पर्यंत वाढले आहे. मात्र, बायको घटस्फोट मागत सोडून गेल्याने आता जवळ बायको आणि मुलगी नसल्याने आनंद कसा आणि कोणासोबत करणार, असा प्रश्न त्याला पडला आहे. आता मला एकटे आणि उदासीन वाटते, असे त्याने म्हटले आहे.

या पोस्टमुळे पुन्हा एकदा कामाचे तास, कामाचा दर्जा आणि वैयक्तीक आयुष्य यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही पदोन्नती आणि मोठ्या पॅकेजसाठी मोठी किंमत मोजली आहे, असे एकाने म्हटले आहे. तसेच करिअरमधील ध्येय आणि कुटुंब याचा ताळमेळ तुम्हाला ठेवता आला नाही, असेही काहींनी म्हटले आहे.