![ूtrump modi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/ूtrump-modi-696x447.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याची चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. तसेच याचा परिणाम शेअर बाजारासह जगाच्या अर्थव्यवस्थेवरही दिसत आहे. मात्र, या भेटीत मोदी-ट्रम्प यांच्या मैत्रीची फक्त हवा असल्याचे दिसून आले. ट्रम्प यांनी मोदींसमोरच हिंदुस्थानबाबतच्या टेरिफ आणि करांबाबत घोषणा करत हिंदुस्थावर कराचा मोठा बोजा लादला आहे. या भेटीत कराबाबत हिंदुस्थानला दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, हिंदुस्थानचा अपेक्षभंग झाला आहे.
या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमोकांचे कौतुक केले. ट्रम्प यांचे धोरण “MAGA” (मेक अमेरिका ग्रेट अगेन) असे घोषवाक्य आहे. त्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की,राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अनेकदा MAGA बद्दल बोलतात. भारतात, आम्ही विकसित हिंदुस्थानसाठी काम करत आहोत. त्यामुळे MIGA (मेक इंडिया ग्रेट अगेन) असे होते. अमेरिका आणि हिंदुस्थान एकत्र काम करतात तेव्हा MAGA आणि MIGA एक होऊन समृद्धीसाठी ‘MEGA’ भागीदारी बनते, असे पंतप्रधान म्हणाले.
या भेटीआधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर कर आकारण्याची घोषणा केली. त्यात त्यांनी हिंदुस्थानवरही मोठे कर लादले. याबाबत ट्रम्प म्हणाले की, कर आकारण्याच्या बाबतीत हिंदुस्थान “सर्वात वरच्या स्थानावर” आहे. हिंदुस्थान अमेरिकेवर सर्वाधिक कर लादतो. त्यामुळे हिंदुस्थानबाबतही आमचे तेच धोरण असेल. तसेच संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी त्यांच्या बाजूला उभे राहून ट्रम्प यांनी सांगितले की, हिंदुस्थान जे काही शुल्क आकारतो, आम्ही त्यांच्याकडून शुल्क आकारतो. या निर्णयामुळे कापड, औषध उत्पादने आणि कृषी निर्यातीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अमेरिका हिंदुस्थानचे सर्वात मोठे निर्यात केंद्र आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी “विशिष्ट समानतेचे क्षेत्र” असण्याची गरज अधोरेखित केली.
हिंदुस्थानसोबत अमेरिकेची व्यापार तूट सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. पंतप्रधान मोदी आणि मी यावर सहमत झालो आहोत की आम्ही दीर्घकाळापासून चालत आलेली असमानता दूर करण्यासाठी वाटाघाटी करू,” असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या भेटीत हिंदुस्थान-अमेरिका मैत्री दृढ करणे, यावर भर देण्यात येत असला तरी अमेरिकेने हिंदुस्थानला कराचा दणका दिला आहे.