
पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये वेशांतर करीत दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. 50 पेक्षा अधिक घरफोडींचे गुन्हे असलेल्या सराईताकडून पोलिसांनी 49 मास्टर चाव्या, सोन्या चांदीचे दागिने, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर असा तब्बल 17 लाख 7हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, 13 घरफोडींचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत आदी उपस्थित होते.
हर्षद गुलाब पवार (31, रा. घोटावडे फाटा, मुळशी) असे या अट्टल चोराचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी एका घरफोडी प्रकरणात गुन्हा दाखल होता. 4 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अजित बडे यांच्यासह पथक हद्दीत गस्तीवर असताना घरफोडीतील संशयित आरोपी हा म्हसोबा गेट बस स्टॉप, शिवाजीनगर येथे असल्याची माहिती अंमलदार सचिन जाधव यांना मिळाली. सापळा रचून पथकाने पवारला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ सोन्या-चांदीचे दागिने आढळले. त्याने गुन्ह्याची कबुली देत, अन्य ठिकाणी रेकी करून घरफोडी केल्याचे सांगितले. वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, उपनिरीक्षक अजित बडे, अंमलदार सचिन जाधव, भाऊ चव्हाण, राजकिरण पवार, महावीर वलटे, आदेश चलवादी यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
.. चोरलेली गाडी परत आणून लावली
■ हर्षदकडे पोलीस सखोल चौकशी करत असताना त्याने आळंदीत घरफोडी केल्याचे सांगितले. या घरफोडीसाठी बावधन येथून एक दुचाकी चोरली होती. घरफोडी करून आल्यानंतर ती गाडी पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडली. दोन दिवसांनी गाडी सोडताना हर्षदने त्या गाडीवर व मालकासाठी टोपीवर चिठ्ठी लिहिली.
■ आरोपी पवार प्रवासासासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यायचा. क्वचितच त्याने दुचाकीचा वापर केला. दुचाकीवरून प्रवास केल्यास ‘सीसीटीव्ही’त कैद होऊन पोलिसांना तपासात मदत होईल, असा विचार तो करीत असे, अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.