
नदीपात्रामध्ये दुर्गंधयुक्त पाणी वर्षानुवर्षे वाहत आहे. संबंधित प्रशासन विभागाने जातीने लक्ष देऊन इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत. येत्या महिनाभरात इंद्रायणी नदी स्वच्छ न केल्यास याच इंद्रायणी नदीचे दूषित करावेच युक्त्या महिनाभरात इंद्रायणी नदी स्वच्छ केल्यास याच इंद्रायणी नदीचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्नान घालून वेळप्रसंगी हे पाणी त्यांना पिण्यास भाग पाडू, असा इशारा समस्या निवारण समितीने दिला आहे.
समितीचे अध्यक्ष सुधीर जगताप, संगीता जाधव, रवींद्र जगताप, आकाश सोनवणे, कृष्णा म्हेत्रे यांनी याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र आळंदी व तीर्थक्षेत्र देहूगाव या दोन्ही ठिकाणी राज्यभरातून व इतर राज्यांतून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूस उंच इमारती, रासायनिक दूषित पाणी सोडणाऱ्या छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. महापालिकेच्या हद्दीतील चिखली, मोशी, डुडुळगाव तसेच आळंदी नगरपरिषदेच्या हद्दीतील इमारतींच्या शौचालयाचा मैला सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. त्यामुळे देहूगाव व आळंदी दरम्यान वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रामध्ये दूषित व आरोग्यास हानिकारक पाणी वाहत असते. पाण्यामध्ये फेस होत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णी निर्माण होत आहे.
दोन्ही तीर्थक्षेत्रांवर राज्यातून व परराज्यातून दर्शनासाठी हजारो भाविक येतात. हे भाविक पवित्र इंद्रायणीत स्नान करतात. नदीतून वाहणारे पाणी रोगराईला निमंत्रण देणारे असून नागरिकांच्या व भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व आळंदी नगरपरिषदेच्या स्थापत्य व मैला शुद्धीकरण व आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाला याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून लक्ष वेधले आहे. परंतु, गेंड्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनाकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जात नाही. यामुळेच नदीपात्रामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी वर्षानुवर्षे वाहत आहे. प्रशासनाने जातीने लक्ष देऊन इंद्रायणी नदी स्वछ करण्यासाठी प्रयत्न करावेत. आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन इंद्रायणी नदीत मैलायुक्त व रासायनिक पाणी थांबविण्याच्या सूचना द्याव्यात. येत्या महिनाभरात इंद्रायणी नदी स्वच्छ न केल्यास याच इंद्रायणी नदीच्या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याने महापालिका, नगरपरिषद व तसेच जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना स्नान घालून वेळ प्रसंगी हे पाणी त्यांना पिण्यास भाग पाडू, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.