मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर RBI चे निर्बंध; खातेदार गोंधळले, अंधेरीत बँकेबाहेर लांबच लांब रांगा

रिझर्व्ह बँकेने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. यामुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहेत. कर्जवाटप आणि ठेवी घेण्यासह बहुतांश व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. तसेच पुढील सहा महिन्यांपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. परिणामी बँकेच्या खातेदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. निर्बंधांमुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. पण बँकेच्या व्यवहारांचे निरीक्षण सुरू आहे आणि गरजेनुसार आवश्यकती कारवाई केली जाईल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

बँकेतील अनियमितता लक्षात आल्यानंतर खातेदारांच्या सुरक्षेचा विचार करून रिझर्व्ह बँकेने हे निर्बंध घातले आहेत. याबाबत रिझर्व्ह बँकेकडून सविस्तर माहिती मिळालेली नाही. पण रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला गुंतवणूक करण्यास आणि उधारी घेण्यावरही मनाई केली आहे. या निर्बंधांमुळे खातेदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. अंधेरीतील विजयनगरच्या शाखेसमोर खातेदारांनी गर्दी केली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी खातेदारांनी गर्दी केली आहे. रिझर्व्ह बँकेने आधी सूचना द्यायला हवी होती. आम्ही आमचे पैसे कसे काढायचे? असे प्रश्न खातेदार करत आहेत.

न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक गेल्या दोन वर्षांपासून तोट्यात आहे. मार्च 2024 मध्ये बँकेला 23 कोटींचा आणि 2023 मध्ये 31 कोटींचा तोटा झाल्याचा अंदाज आहे. 31 मार्च 2024 पर्यंत बँकेचा अ‍ॅडव्हान्स 1,175 कोटी होता. त्यापूर्वी म्हणजे 2023 मध्ये बँकेचा अ‍ॅडव्हान्स हा 1,330 कोटी इतका होता.