भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघातात माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा जागीच मृत्यू झाला. अकोला ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर शिवानी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लबमध्ये राजकीय बैठक आटोपून घरी परतत असताना गुरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात तुकाराम बिडकर यांच्यासह दुचाकीवर सोबत असलेल्या त्यांच्या सहकाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.

सदर ट्रक गुरे वाहून नेत असल्याने पोलीस पाठलाग करत होते. पोलिसांपासून पिच्छा सोडवण्यासाठी चालक भरधाव वेगात ट्रक पळवण्याच्या प्रयत्नात असताना ही दुर्घटना घडल्याचे कळते. बिडकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.