अख्ख्या ‘समृद्धी’वर लागणार सीसीटीव्ही, लेनची शिस्त आणि वेगमर्यादा मोडणाऱ्या वाहनचालकांवर होणार आता कारवाई

राज्यातील दहा जिल्हांना थेट मुंबईशी जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गावरील अपघातांची मालिका रोखण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल उचलले असून, आता अख्ख्या महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. लेनची शिस्त आणि वेगमर्यादा मोडणारे वाहनधारक या कॅमेऱ्यात टिपले जाणार असून, त्या आधारे त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. सध्या या महामार्गावर कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असून, सहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारणीचे कामही वेगाने सुरू आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची राज्यातील एकमेव सुपर एक्स्प्रेस महामार्ग म्हणून ओळख आहे. नागपूर ते मुंबई असे 701 किलोमीटरचे अंतर केवळ 8 तासात पार करता येणाऱ्या या मार्गाने हजारो वाहनधारकांना भुरळ घातली आहे. त्यामुळे सुसाट प्रवास करण्यासाठी दरदिवशी हजारो वाहने या महामार्गावरुन धावत आहेत. दुसरीकडे लेनची शिस्त मोडणाऱ्या आणि अतिवेगाने धावणाऱ्या वाहनधारकांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे. वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून या महामार्गावर 2024 अखेरपर्यंत 320 अपघात झाले असून, यामध्ये सुमारे 200 जणांचे बळी गेले आहेत. अपघातांची ही मालिका 2025 मध्येही सुरू आहे, सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना तात्कालिक असल्याने त्याचा कुठलाही परिणाम दिसून आला नाही. रोकडो जणांचे बळी घेतलेल्या या अपघात होण्याला वेगवेगळी कारणे असल्याचे समोर आले असले तरी वाहनधारकांकडून लेनची शिस्त मोडणे आणि वेगमयदिचे तीनतेरा करणे हेही या अपघातासाठी कारण असल्याचे समोर आले आहे.

या महामार्गाची उभारणी करताना येण्यासाठी आणि जाण्यासाठी प्रत्येकी तीन लेन असा सहा पदरी रस्ता करण्यात आला आहे. यामध्ये तीन पदरी रस्त्यावर एक लेन 80 किलोमीटर प्रति तास, दुसरी लेन 120 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी आणि तिसरी लेन ओव्हरटेक करण्यासाठी आहे. मात्र, कुणाचेच नियंत्रण नसल्याने आणि कारवाईची भीती नसल्याने बहुतांश वाहनधारक या लेनची शिस्त पाळत नाहीत. या महामार्गावरही अनेक वाहनचालक मस्ती करतात. असे मस्ती असलेले वाहनधारक महामार्गावर वेग मर्यादा 120 किलोमीटर प्रति तास अशी असताना 140 ते 160 किलोमीटर प्रति तास वेगाने आपली वाहने चालवित आहेत. यामध्ये कारचे प्रमाण अधिक आहे. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनामध्ये ट्रक आणि अशिक्षित चालकांनी कहर केला आहे. दरदिवशी इगतपुरी ते नागपूर या दरम्यान शेकडो ट्रक दुसत्या म्हणजे 120 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या वाहनासाठी असलेल्या लेनमधून संपूर्ण प्रवास करीत आहेत, तर अशिक्षित आणि मौजमस्ती करण्यासाठी समृद्धीवरून प्रवास करणाऱ्या जीप, मेटॅडोअर, पिकअप व्हॅन यासह काही
वाहनांच्या चालकांना या महामार्गाचे कुठलेही गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. हे वाहनधारक ओव्हरटेक करणाऱ्या लेनमधून तर कधी 120 किलोमीटर प्रति तास वेगमर्यादा असलेल्या लेनमधून 60 ते 70 किलोमीटर प्रतितास वेगमयदिने मस्ती करीत आपली वाहने चालवित आहेत. त्यामुळे वेगमयदिने धावणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, आता सरकारने उशीरा का होईना, समृद्धीवरील अपघाताचे सन्न रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या असून, यामध्ये अख्ख्या समृद्धी महामार्गावर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गावर ठराविक अंतरावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या तीन-तीन अशा सहा लेनवर धावणाऱ्या वाहनांवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. लेनची शिस्त मोडणाऱ्या आणि अतिवेगाने घावणाऱ्या वाहनधारकांचा कारनामा या सीसीटीव्हीत कैद होणार असून, क्षणात याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. त्यानुसार त्या-त्या वाहनधारकांवर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई कशा स्वरूपाची असेल, याचाबत अद्याप सरकारकडून माहिती देण्यात आलेली नाही, मात्र कारवाई कठोर असली तरच वाहनधारकांना शिस्त लागणार आहे. ही कारवाई किरकोळ दंडात्मक असल्यास वाहनधारकांची विशेषतः ट्रकचालकांची मुजोरी कायम राहणार असून, यामुळे अपघातांचे सत्रही सुरूच राहणार आहे.

सहा ठिकाणी नियंत्रण कक्ष

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावर लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमे-यांचे नियंत्रण करण्यासाठी इगतपुरी ते नागपूर दरम्यान महामार्गालगत आणि टोलनाक्याजवळ सहा ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात येत आहेत. इगतपुरी, छत्रपती संभाजीनगरजवळील माळीवाडा, जालना, वाशीमजवळील मालेगाव जहांगीर आणि नागपूरजवळ दोन अशा या सहा नियंत्रण कक्षाचे काम सध्या सुरू आहे. हे कक्ष उभारण्यासाठी कंत्राटदाराला सहा महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. दुसरीकडे महामार्गावर सीसीटीव्ही बसविण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. 10 ते 12 महिन्यात हे काम पूर्ण होऊन समृद्धीवरील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू होणार आहे.