
कल्याण-डोंबिवलीत 90 टक्के बांधकाम बेकायदा आहे. तेथील अनधिकृत इमारतींना कोणत्याही प्रकारचे संरक्षण मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी खडसावले. न्यायालयाच्या आदेशानुसार येथील 65 इमारतींवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यातील काही इमारती व रहिवाशांनी या कारवाईविरोधात स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांवर सुनावणी घेण्यासाठी न्या. अजय गडकरी व न्या. अमित बोरकर यांचे विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आले होते. अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कारवाई नियमानुसार होत नसल्यास अर्ज दाखल करणे व्यवहार्य ठरते. कारवाई करण्याच्या न्यायालयाच्या आदेशासंदर्भात नव्याने अर्ज करता येत नाही. मुळात बांधकामच अवैध असल्याचे स्पष्ट झाले असताना नव्याने सुनावणी घेण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र उच्च न्यायालयाच्या कारवाईच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. साई गॅलेक्सी सोसायटीने केलेला अर्ज आम्ही फेटाळत आहोत. हेच आदेश अन्य अर्जदारांना लागू होतील. याबाबत आम्ही सविस्तर आदेश देऊ, असेही न्यायालयाने नमूद केले. परिणामी येथील अवैध इमारतींवरील कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
न बरा होणारा आजार
दिवामध्ये सर्वच अनधिकृत असून उल्हासनगरमध्ये 80 टक्के बांधकामे बेकायदा आहेत. अवैध बांधकामे हा न बरा होणारा आजार आहे. अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यात हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
नियमनाचे 32 अर्ज फेटाळले
65 पैकी 32 इमारतींनी नियमनासाठी अर्ज केले होते. हे सर्व अर्ज फेटाळण्यात आले आहेत, अशी माहिती पालिकेचे वकील ए. एस. राव यांनी न्यायालयाला दिली. पालिकेने नियमन मान्य केले नसल्याने न्यायालयातील अर्जावर सुनावणी घेण्याचा विषयच संपला आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
संदीप पाटील यांनी केलेल्या जनहित याचिकेवर निकाल देताना कल्याण-डोंबिवलीतील अवैध बांधकामांवर कारवाई सुरू ठेवण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले. त्यानुसार पालिकेने येथील 65 इमारतींवर कारवाई सुरू केली. नियमनाचा अर्ज केला असल्यास कारवाई करता येत नाही, असा दावा करत काही इमारती व रहिवाशांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले. नियमनाच्या अर्जावर निर्णय होईपर्यंत पालिकेने कारवाई करू नये, असे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले होते.
प्रभादेवीत रंगला थरांचा थरार
शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत सुरू असलेल्या ‘सांस्कृतिक कला व खेळ महोत्सव’अंतर्गत गुरुवारी प्रभादेवीतील चवन्नी गल्ली येथे दहीहंडी स्पर्धा पार पडली. शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या या स्पर्धेत स्पेनचे स्पर्धकदेखील सहभागी झाले होते. यावेळी जोगेश्वरी मजासवाडी येथील पथकाने स्पॅनिश शैलीत पाच मनोरे उभारून सलामी दिली.