![mahakumbh (2)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/mahakumbh-2-2-696x447.jpg)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. हा महाकुंभचा योग तब्बल 144 वर्षांनी जुळून आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराजला जात आहेत. मात्र, रेल्वे फुल्ल असल्याने अनेकांना तिकीट मिळत नाही. तसेच जागा मिळवण्यासाठी धक्काबुक्की होत आहे. त्यामुळे अनेकजण विमान प्रवास करत आहेत. मात्र, विमान तिकीटांचे प्रयागराजचे दर पाहून भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. विमान कंपन्यांनी ही काय लूट चालवली आहे, असा संतप्त सवाल भाविक करत आहेत.
आतापर्यंत तब्बल ४५ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. महाशिवरात्रीपर्यंत कुंभमेळा असल्यामुळे अद्यापही लाखो भाविक प्रयागराज येथे रेल्वे, विमान, रस्तेमार्गांनी पोहोचत आहेत. मात्र, प्रयागराज येथे जाण्यासाठी विमानाच्या तिकीट दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी विमान कंपन्यांना, वाजवी तिकीट दर आकारण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, अजूनही विमान तिकिटाच्या दरात काहीही बदल झाले नसल्याने भआविक संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट केल्या आहेत.
प्रयागराज येथे भाविकांची वाढणारी लक्षात घेत केंद्र सरकारने विमान कंपन्यांना अतिरिक्त विमान सेवांना परवानगी दिली. त्यानुसार, विमान कंपन्यांनीही प्रयागराज येथे जाणाऱ्या विमान सेवांची संख्या वाढवली. त्यानंतर, काही प्रमाणात तिकीट दर कमी झाले. मात्र, अजूनही या प्रवासासाठी कंपन्या ‘वाजवी दर’ आकारत नसल्याचे दिसत आहे. मुंबई ते प्रयागराज तिकिटाचे दर आत्ताही 20ते 25 हजार आहेत. तसेच जवळच्या तारखेचं तिकीट हवं असेल तर ते 30 ते 35 हजार मोजावे लागत आहेत.
सोशल मिडीयावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिसत आहे. अनेकांनी म्हटले आहे की, लंडन किंवा अमेरिकेला जाण्यापेक्षा प्रयागराज येथे विमानाने जाणे महाग झाले आहे. काही जणांनी विमान तिकिटाच्या दराचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. ही लूट चालवली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अनेक युझर्सनी नागरी विमान उड्डाण मंत्रालय, डीजीसीए यांना टॅग करत याबाबत गाऱ्हाणी मांडली आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानंतर विमान कंपन्यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवल्याने अनेक युजर्सनी म्हटले आहे.