![Ladki bahin yojana](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Ladki-bahin-yojana-696x447.jpg)
निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. पण आता याच योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. राज्याच्या तिजोरीत पैसे नसल्याने आता राज्य सरकारने आपल्या खर्चात कपात केली आहे. राज्य सरकार 2024-25 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पातील 100 टक्के निधी वापरणार नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने विविध विभागातली विविध खर्चावर कात्री लावली आहे.
हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. इमारती बांधकाम, रस्त्यांचे बांधकाम, गाड्या विकत घेणे आणि जाहिरातींवर 30 टक्के खर्च कपात करण्यात आला आहे. तर ओव्हरटाईम, फोन आणि पाण्याचे बिल, भाडे आणि कर, सुरक्षा, इंधन आणि वाणिज्यिक सेवांवर 20 टक्के खर्च कपात करण्यात आले आहेत.
2024-25 चा सर्व निधी आर्थिक वर्षात वापरला तर महसूली तूट ही एक लाख 1.10 लाख कोटींवरून 2 लाख कोटींवर जाईल.
यंदा राज्य सरकारचा एकूण खर्च हा 6.25 लाख कोटींच्या घरात आहे, तर महसूल हा 5.10 लाख कोटींच्या घरात आहे अशी माहिती मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली. खर्च आणि महसूल यांचे गणित राखण्यासाठी ही कपात गरजेची आहे. तसे न केल्यास मसहूली तूट ही 2 लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची भिती आहे. त्यामुळे ही तूट कमी करण्यासाठी सरासरी 20 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
खर्चात कपात करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पूर्वी राज्य सरकारने खर्चात 5 ते 10 टक्क्यांनी कपात केली होती. पण यंदा लाडकी बहीण योजनेमुळे ही कपात वाढली आहे.