आम्ही बिहारमध्ये असताना कसं काय… ; केजरीवाल यांच्या पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांचं भाजपला आव्हान

दिल्ली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता साऱ्यांचे लक्ष बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे आहे. त्यामुळे आतापासूनच बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. बिहारमध्ये आगामी निवडणुका पाहता वेगवेगळ्या मंत्र्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी दिल्लीतील ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही असताना भाजपला सरकार स्थापन करायला देणार नाही, असे आव्हानच लालू प्रसाद यादव यांनी दिले आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाविषयी प्रश्न करत याचा परिणाम आता बिहारमध्येही पहायला मिळेल का? असा प्रश्न लालू प्रसाद यादव यांना माध्यमांनी विचारला. यावर लालू प्रसाद म्हणाले, दिल्ली निवडणुकीचा परिणाम बिहारमध्ये दिसणार नाही आणि आम्ही असताना बिहारमध्ये कसे काय भाजपला सरकार स्थापन करायला देऊ? आम्ही लोकं एकजुटीने सामना करणार आहोत.

पुढे लालू म्हणाले की, बिहार समजणे साधी गोष्ट नाही. आम्ही पूर्ण ताकदीने लढायला तयार आहोत असे सांगितले. यावेळी त्यांनी पक्षाची तयारी कशी सुरू आहे तेही माध्यमांना सांगितले. यावेळी बिहारच्या जनतेला मोफत वीज आणि तरुणांना सरकारी नोकरी आाणि रोजगार दिला जाणार असल्याचेही ते म्हणाले.