![bride](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/02/bride1-696x447.jpg)
उत्तर प्रदेशातील महाराजगंजमधील घुघलीमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नानंतर हनिमूनच्या रात्रीच नववधूने असे काही केले की सासरच्या मंडळींना मोठा धक्काच बसला. हनीमूनच्या रात्री साथीदाराच्या मदतीने लाखोंचे दागिने घेऊन नववधू लंपास झाली. पतीने या घटनेत सासरच्या लोकांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामपूर बल्डीहा येथील तरुणाचा विवाह कोठीभारच्या हरपुर पकडी उर्फ घिवहा येथील तरुणीशी 7 फेब्रुवारी रोजी झाला होता. ती 10फेब्रुवारीला सासरी आली होती. लग्नघर असल्याने घरात गोंधळ होता. त्यामुळे नववधूच्या नणंदेने वहिनीच्या खोलीतच तिचे दागिने ठेवले होते. नवरदेवाच्या म्हणण्यांनुसार त्याने 3 लाख 50 हजारांचे दागिने लग्नात पत्नीला घातले होते आणि जवळपास 2 लाख 50 हजारांचे दागिने त्याच्या बहिणीने त्यांच्या खोलीत ठेवले होते. 11 फेब्रुवारी रोजी रात्री 8 च्या सुमारास घरात पाहुण्यांना जेवण वगैरे सुरु होते. घरचे सर्व व्यस्त होते त्याचवेळी संधी साधून नववधू ते सर्व दागिने घेऊन पसार झाली. संपूर्ण रात्र आजुबाजुचा परिसर पिंजून काढल्यानंतरही तिचा काहीच पत्ता लागला नाही. तिच्या माहेरी फोन केला असता ती तिच्या माहेरीही गेली नव्हती.
वधूच्या आई-वडिलांनी आणि भावाने सांगितले की त्यांचा आता तिच्याशी काहीही संबंध नाही. पुन्हा इथे येऊ नका, असे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात माहेरच्या माणसांचाही सहभाग असल्याचा संशय नवरदेवाने व्यक्त केला आहे. पोलीस स्टेशनचे प्रभारी कुंवर गौरव सिंह यांनी या प्रकरणाची तक्रार मिळाली असून चौकशी सुरू असल्याचे म्हटले.