![new-pmpl-buses](https://www.saamana.com/wp-content/uploads/2018/02/new-pmpl-buses-696x447.jpg)
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएलचा) संचालनातील तूट दरवर्षी वाढतच आहे. गेल्या दहा वर्षांत ही तूट सातपटीने वाढून 766 कोटी 84 लाखांवर पोहोचली आहे. भाडे दरवाढ नाही, पासेसची विक्री घटणे, सेवकवर्गाच्या वेतनावरील खर्च, तपासणी पथक सक्षम नसणे आदी कारणांमुळे ही तूट वाढत असल्याचे मत मुख्य लेखापरीक्षक जितेंद्र कोळंबे यांनी व्यक्त केले आहे. तोटा कमी करण्यासाठी लेखापालांनी काही पर्याय सुचविले असले, तरी आजवरचा कारभार पाहाता त्याची अंमलबजावणी होणे शक्य नाही.
पीएमपीएमएलच्या वार्षिक लेख्यांची तपासणी करून मुख्य लेखापरीक्षक कोळंबे यांनी स्थायी समितीला अहवाल सादर केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह लगतच्या ग्रामीण भागात वाहतूक सुविधा पुरविणाऱ्या पीएमपीएमएलची तूट 766 कोटी 84 लाख रुपयांवर पोहोचली आहे. 2014-15 मध्ये पीएमपीएमएलला 99 कोटी 44 लाख रुपयांचा तोटा झाला होता. 2015-16 या वर्षात पीएमपीएमएलला सुमारे 304 कोटी रुपये इतकी संचलनातील तूट होती. याचे प्रमाण 34.25 टक्के इतके होते. ते 2023-24 या वर्षात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यावर्षी 766 कोटी 87 लाख इतकी तूट दिसत असून, तिचे प्रमाण 59-58 टक्के इतके असल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.
कंपनी स्थापनेनंतर संचलनातील तुटीपोटी पुणे महापालिका तोट्याची 60 टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिका 40 टक्के भरपाई करून पीएमपीएमएलला टेकू देत आली आहे. तर, पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर मागील वर्षीपासून पीएमआरडीएने देखील तुटीपोटी काही हिस्सा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 2025-26 मध्ये पुणे महापालिकेला सुमारे 400 कोटी रुपये इतकी संचलनातील तूट भरून देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी लागणार आहे.
तूट कमी करण्यासाठी हे करा
उत्पन्नातील गळती कमी करण्यासाठी तपासणी पथकांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. शास्त्रीय पद्धतीने तिकीट व पासदराचा अभ्यास होणे गरजेचे असून, बसेसचा डेड किलोमीटर खर्च कमी करणे, बंद पडणाऱ्या बसेसबद्दल योग्य तो निर्णय घेणे, पीएमपीएच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करणे, मार्गाची फेररचना करून तुटीतील मार्ग बंद करणे, मेंटेनन्स व इतर खर्चात काटकसर करणे, आदी उपाययोजना अहवालात सुचवल्या आहेत.
…यामुळे वाढली तूट
पीएमपीएमएलला तिकीटविक्री आणि पासविक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. कोणत्याही प्रकारच्या तिकीट आणि पासच्या दरात वाढ केली गेली नाही. तपासणी पथक सक्षमपणे काम करीत नाही. बस संचलनात प्रतिकिलोमीटरसाठी येणारा खर्च अणि प्रत्यक्षात प्रतिकिलोमीटर मिळणारे उत्पन्न यातील तफावत दूर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून मिळणाऱ्या पासेसच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. उत्पादन खर्च, उत्पादित धाव, स्थायी खर्चात कोणतीही बचत न केल्याने तुटीत 60 टक्के वाढ आणि सेवकांच्या वेतनावरील खर्चात सातत्याने होणारी वाढ यामुळे तूट वाढल्याचे अहवाल नमूद केले आहे.