![dhananjay-munde](https://www.saamana.com/wp-content/uploads/2021/01/DHANANJAY-MUNDE-696x447.jpg)
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच महायुतीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परळीच्या फौजदारी न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात धनंजय मुंडे यांनी खरी माहिती लपवल्याची ऑनलाईन तक्रार करुणा मुंडे यांनी केली होती. याच तक्रारीची दखल घेत न्यायालयाने धनंजय मुंडे यांना नोटीस बजावली असून याबाबत 24 फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. करुणा मुंडे यांचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रामध्ये पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह त्यांच्या तीन मुलींचा आणि करुणा मुंडे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र यात करुणा मुंडे यांच्या मिळकतीचा उल्लेख करण्यात आला नव्हता.
हाच धागा पकडत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी खरी माहिती दडवून ठेवल्याचा आरोप करत परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार दाखल केली होती. तक्रारीची मूळ कागदपत्रे 5 फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर सादर करण्यात आला. त्यावरून न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी दिली.