![wasvani bridge](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/wasvani-bridge-696x447.jpg)
कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाऊस) यांना जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पाडण्याच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. कोरेगाव पार्क बाजूकडून पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. कोरेगाव पार्क कडील बाजूस असलेल्या 8 पिअर्सपैकी 7 पिअर्सचे काम पूर्ण झाले आहे. तर, पुलाच्या कॅम्पकडील बाजूस पुलाखाली झोपड्या असल्याने पुलाचे पाडकाम करण्यास अडथळा येत होता. मात्र, आता पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयामार्फत हडपसर स. नं. 132 येथील एसआरए प्रकल्पामध्ये करण्यात आले आहे. तसेच इतर ठिकाणच्या पुलाखालील झोपड्या हटवल्याने कॅम्पकडील साधू वासवानी पुलाची बाजू पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे स्टेशनजवळ, कोरेगाव पार्क भागात हा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल आहे. हा पूल बांधून 50 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तो पाडून नवीन रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरेगाव पार्क बाजूकडून पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
कोरेगाव पार्ककडील बाजूस असलेल्या 8 पिअर्सपैकी 7 पिअर्सचे काम पूर्ण झाले आहे. तर, पुलाच्या कॅम्पकडील बाजूस पुलाखाली झोपड्या असल्याने पुलाचे पाडकाम करण्यास अडथळा येत होता. त्यामुळे पुलाचे पाडकाम रखडले होते. मात्र, आता पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयामार्फत हडपसर स. नं. 132 येथील एसआरए प्रकल्पामध्ये करण्यात आले आहे. तसेच इतर ठिकाणच्या पुलाखालील झोपड्या परिमंडळ क्र. 1 अंतर्गत ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयामार्फत हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प विभागाकडून पाडकाम सुरू करण्यात आले आहे.
सुमारे 83 कोटींचा खर्च अपेक्षित
पुलाच्या कामासाठी सुमारे 83 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एस. एम. सी. इन्फ्रा या कंपनीने 56 कोटी 18 लाख रुपयांची निविदा भरली असून, त्यांना हे काम देण्यात आले आहे. तसेच या कामाकरिता पुढील दोन वर्षांच्या अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद टप्प्याटप्प्याने करावी लागणार आहे. मात्र, आता पुलाचे काम सुरू झाले असून, 9 महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता (प्रकल्प) विभागामार्फत हे काम करण्यात येत आहे. ओपन वेब गर्डर या पद्धतीने हा पूल बांधला जाणार आहे. या उड्डाणपुलाची लांबी 640 मी. असून, पुढील 9 महिन्यांमध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.