महाराष्ट्र, दिल्ली निवडणुकांमध्ये EVM आणि मतांचा फ्रॉड, भाजप-निवडणूक आयोग एकच! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि खासदार प्रियंका चतुर्वेदीही उपस्थित होते. महाराष्ट्र आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि मतांमध्ये मोठा फ्रॉड झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

राहुल गांधी यांची काल भेट घेतली. यानंतर आज अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहोत. ही सदिच्छा भेट आहे. आधी महाराष्ट्राची आणि आता दिल्लीची निवडणूक झाली. दोन्ही निवडणुकांमध्ये एक साम्य आहे. जे कोणी जिंकले आहेत त्याच्यात मोठा हात हा निवडणूक आयोगाचा आहे. निवडणुकीत जो फ्रॉड झाला आहे, मतांचा फ्रॉड करण्यात आला आहे, हे लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. ठळकपणे जगासमोर आणणं गरजेचं आहे. आपल्या देशात निर्भय आणि निःपक्ष वातावरणात निवडणुका होत आहेत का? याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

मोर्चे बांधणी सुरू आहे. जे कोणी सत्ताधारी असो की विरोधी पक्षातले, कुठल्याही राज्यातले नेते आम्हाला भेटताहेत. त्यांचं म्हणणं एकच आहे, सर्व यंत्रणा आणि प्रक्रिया ही निःपक्ष आणि निर्भय वाटत नाही. भाजप आणि निवडणूक आयोगात काहीच फरक वाटत नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. ईव्हीएमबद्दल अनेक पक्षांची वेगवेगळी मतं असतात. जिंकलो आणि हरलो तरी आमचं मत ठाम आहे. ईव्हीएममध्ये निवडणूक आयोगाने अजून एक स्पष्टता द्यावी की, माझं मत नक्की कुठे जातंय हे अजूनही कळत नाहीये. अनेक आमच्या उमेदवारांनी जे पडले किंवा निवडणूक आयोगाकडून पाडलं गेलं, त्यांनी फेरमतमोजणी मागितली होती. पण त्याला आयोगाने मंजुरी दिली नाही. त्यांना मॉक पोल घेण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली. या प्रकरणी एक-दोन जण कोर्टात गेले आहेत. पण ईव्हीएमबद्दल थोडी अजून स्पष्टता येणं गरजेचं आहे. व्हीव्हीपॅटमधली चिठ्ठी बाहेर येत नाही. ती खरोखर खाली पडते का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.

ईव्हीएम ही तांत्रिक गोष्ट झाली. त्याच सोबत दुसरी गोष्ट महाराष्ट्रातही पाहायला मिळाली. 47 लाख मतदार वाढवलेले आहेत. 76 लाख मतदार जे शेवटच्या तासात वाढले आहेत. याबद्दल निवडणूक आयोगाने कुठेही स्पष्टीकरण दिलेले नाही. निवडणूक आयोगाने शेवटच्या तासातल्या मतदानाचं व्हिडिओ फुटेज द्यावं. शेवटच्या तासानंतर मतदान करायचं असेल तर टोकन द्यावं लागतं. तेव्हा किती लोकांनी मतदान केलं? याचं टोकन दाखवा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.