![surat](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/surat--696x447.jpg)
गुजरातच्या सूरतमधील एका शाळेच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ चांगलाच महागात पडलाय. येथील एका प्रतिष्ठित शाळेच्या 12 वीच्या एकूण 35 विद्यार्थ्यांनी दांडी रोडवर तब्बल 28 आलिशान गाड्यांचा ताफा काढला. एवढेच नाही तर या विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी करत याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. या प्रकरणामुळे लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. यामुळे पोलिसांनी या विद्यार्थ्यांना चांगलाच इंगा दाखवत मोठी कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर व्हिडीओ 7 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहेत. सध्या देशात 10 वी / 12 वीच्या परीक्षांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन केले जाते. सूरतच्या एका नामांकित शाळेतही निरोप समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी 12 वीच्या विद्यार्थ्यानी अक्षरश: धिंगाणा घातला.
निरोप समारंभ संपल्यावर तब्बल 28 विद्यार्थ्यांनी आपल्या महागड्या गाड्यांसोबत स्टंटबाजी करत रील्स व्हिडीओ बनवले. यापैकी सगळ्यांकडेच आलिशान गाड्या होत्या. या सगळ्यांनी मिळून सूरतच्या दांडी रोडवर गाड्यांचा ताफा चालवला. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करत 20 गाड्या जप्त केल्या आहेत.
સુરતમાં આ તે કેવું ફેરવેલ…?, ધોરણ 12 ના વિદ્યાર્થીઓ નીકળ્યા લગઝરી કારના કાફલા સાથે…..#surat #suratcity #suratcitypolice #suratpolice #student #students #car #cars #trending #tranding #breakingnews #viralnews #newsupdate #viral #tras #vehicle #shandarrajkot pic.twitter.com/4alFHamuj1
— Shandar Rajkot (@ShandaRajkot) February 10, 2025
सदर प्रकरणावर पोलीस अधिकारी अमिता वनानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेचा व्हिडीओ मिळताच आम्ही कारवाई सुरू केली आहे. ताफ्यातील प्रत्येक गाडीचे पेपर आणि लाईसन्सचा तपास सुरू केला आहे. तसेच अल्पवयीन मुलांना गाड्या देऊन नियमांचे उल्लघन केल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अमिता वनानी यांनी दिली आहे.
दरम्यान, शाळा प्रशासनाने या प्रकरणातून काढता पाय घेतला आहे. विद्यार्थ्यानी महागड्या गाड्या शाळेत आणण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. आम्ही निरोप समारंभासाठी विद्यार्थ्यांना शाळेतर्फे बस पाठवली होती. मात्र कोणीही बसने आले नाही. तसेच आम्ही कोणत्याही गाडीला शाळेच्या परिसरात प्रवेश दिलेला नाही, असे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.