श्रीनाथ म्हस्कोबा-जोगेश्वरी विवाह सोहळा उत्साहात

‘सवाई सर्जाचं चांगभलं ‘च्या जयघोषात, पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने, गुलालाची मुक्त उधळण करत श्रीक्षेत्र वीर येथे श्री नाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा मंगळवारी रात्री 2.55 वाजता उत्साहात पार पडला. याप्रसंगी परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो नाथभक्तांनी हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवला. आजपासून 23 फेब्रुवारीपर्यंत 13 दिवस चालणाऱ्या वीर यात्रेला या विवाह सोहळ्याने उत्साहात प्रारंभ झाला आहे.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी राऊतवाडी येथील मान स्वीकारून मानाची कोडीत येथील पालखी वीरच्या वेशीवर रात्री पावणेआठच्या सुमारास दाखल झाली. तेथे गावाच्या वतीने मुकादम, पाटील, विश्वस्त, मानकरी, सालकरी, दागिनदार यांनी स्वागत केले. सर्व पालख्यांनी देऊळवाड्यात दक्षिण दरवाजाने प्रवेश केल्यावर दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर मानकरी राऊत यांचा उत्सव मूर्तीना पोशाख, मंडवळ्या व अलंकार घालण्यात आले. त्यानंतर सर्व देवतांना आवतन देण्यात आले. कोडीत, राजेवाडी, भोंडवेवाडी, सुपे सोनवडी, पुणे (कसबा पेठ), कण्हेरी आदी पालख्या व काठ्या दक्षिणेकडून अंधार

चिंच येथे गेल्या, तेथे कण्हेरी व वाई या पालख्यांची पारंपरिक भेट झाली. तेथे शिंगाडे, व्हटकर, तरडे, बुरुंगले, ढवाण यांचा पुष्पहार घालून मानपान करण्यात आला. मंदिरात मुख्य पुजाऱ्यांनी देवांना अलंकार व पोशाख घातले. रात्री सर्व पालख्या व काठ्या देऊळवाड्यात दाखल झाल्या. त्यांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर गुरव समाजाकडून अक्षता वाटप करण्यात आले.

मध्यरात्री ग्रामपुरोहितांनी मंत्रोच्चार सुरू केले. गावचे पाटील चंद्रकांत धुमाळ यांच्या हस्ते हा शाही सोहळा 2 वाजून 55 मिनिटांनी संपन्न झाला. दीपक, नंदकुमार संतोष, श्रीकांत व किशोर या थिटे बंधूंनी पौरोहित्य केले. त्यानंतर सर्व लवाजमा वाद्यांच्या गजरात माळावर भक्त कमळाच्या भेटीला रवाना झाला. भल्या पहाटे पालख्या व काठ्या आपापल्या तळावर विसावल्या.

यात्रेच्या निमित्ताने मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट करण्यात आली आहे. पाणी, वीज, वाहनतळ दर्शनरांगा, पुरेसा पोलीस बंदोबस्त आदी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्य विश्वस्त राजेंद्र धुमाळ व अन्य विश्वस्तांनी दिली. सर्व मानकरी, ग्रामस्थ, सालकरी, ग्रामपंचायत यांसह अमोल धुमाळ, काशिनाथ धुमाळ, प्रमिला देशमुख, विराज धुमाळ, बाळासाहेब समगीर, अलका जाधव, जयवंत सोनवणे, श्रीकांत थिटे, सुनील धुमाळ या सर्व विश्वस्त मंडळींनी सोहळ्याचे उत्तम नियोजन केले आहे.